येथील पंतप्रधान कार्यालयातील एका खोलीस मंगळवारी सकाळी आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. सुदैवाने आग लवकरच आटोक्यात आणली गेली तसेच या आगीत कोणीही जखमी झालेले नसून कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांचेही नुकसान झाले नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान कार्यालयातील संयुक्त चिटणीस वापरत असलेल्या ६० क्रमांच्या खोलीत मंगळवारी सकाळी ६.१० च्या सुमारास आग लागली होती. कार्यालयातील संगणकाला जोडलेल्या यूपीएस नादुरूस्त होऊन अचानक आग लागली. त्यानंतर सहा ते सात अग्निशमन दलाच्या गाडय़ांनी घटनास्थळी धाव घेत काही मिनिटांतच आग नियंत्रणात आणल्याचे दिल्ली अग्निशमन दलाचे संचालक ए. के. शर्मा यांनी सांगितले. या आगीत कोणीही जखमी झालेले नसून कोणत्याही प्रकारे मालमत्तेचे वा सरकारी दस्तावेजांचे नुकसान झाले नाही.