इस्रायलने दक्षिण गाझामधील नासेर रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात पाच पत्रकारांसह २० जणांचा मृत्यू झाला. मृत पत्रकार असोसिएटेड प्रेस, रॉयटर्स, अल जझीरा यांच्यासह इतर वृत्तसंस्थांसाठी काम करीत होते. मृतांमध्ये रुग्णालयातील कर्मचारी आणि इतरांचाही समावेश आहे.

‘असोसिएटेड प्रेस’च्या मुक्त पत्रकार मॅरियम डाग्गा (वय ३३) यांचा हल्ल्यात मृत्यू झाला. ‘अल जझीरा’च्या महंमद सलाम यांचाही मृत्यूही झाला. ‘रॉयटर्स’चा कॅमेरामन हुसाम अल मास्री यांचा रुग्णालयातून थेट प्रक्षेपण करताना मृत्यू झाला. विविध वृत्तसंस्थांसाठी काम करणारे मुक्त पत्रकार मोआझ अबू ताहा, अहमद अबू अझीझ या अन्य दोन पत्रकारांचा मृतांमध्ये समावेश आहे, तर छायाचित्रकार हतीम खालेद जखमी झाले.

रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. डाग्गा यांच्या मृत्यूनंतर ‘एपी’ने डाग्गा यांच्यासह इतर पत्रकारांचा झालेला मृत्यू धक्कादायक असल्याचे निवेदन प्रसिद्ध केले. नासेर रुग्णालयावरील इस्रायलच्या हल्ल्यात एकूण १९ जणांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाचे प्रमुख झहर अल वाहिदी यांनी ही माहिती दिली. डाग्गा यांना १२ वर्षांचा मुलगा आहे. युद्धाच्या सुरुवातीला गाझामधून त्याला सुरक्षित स्थळी नेण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टर मुलांना वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ कशी करीत आहेत, याचे वृत्तांकन डाग्गा यांनी केले होते. नासेर रुग्णालयातूनच त्यांनी दीर्घ काळ वार्तांकन केले.

वार्तांकनावर निर्बध

या युद्धाचे वार्तांकन करण्यापासून आंतरराष्ट्रीय माध्यमांना इस्रायलने रोखले आहे. त्यामुळे गाझामध्ये नक्की काय होत आहे, याची माहिती जगाला व्हावी, यासाठी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था पॅलेस्टाइनमधील स्थानिक पत्रकार आणि नागरिक यांच्या हवाल्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. इस्रायलने पॅलेस्टाइनच्या पत्रकारांच्या विश्वासार्हतेवर कायमच शंका उपस्थित केल्या आहेत. गाझामध्ये काम करणाऱ्या अनेक पत्रकारांनाही त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांसाठी अन्न मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे.

संरक्षण दलाची दिलगिरी

इस्रायलच्या लष्कराने, संरक्षण दलांनी या हल्ल्याची कबुली दिली असून, चौकशीचे आदेश दिले आहेत. पत्रकारांच्या आणि निरपराध नागरिकांच्या मृत्यूबद्दल इस्रायलच्या संरक्षण दलांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. इस्रायल-हमासच्या संघर्षात आतापर्यंत २४० हून अधिक पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. या तुलनेत रशिया-युक्रेन युद्धात आतापर्यंत १८ पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. दोन आठवड्यांपूर्वी इस्रायलच्या हल्ल्यात अल जझीराच्या अनास शरीफ यांचा मृत्यू झाला होता.