पुण्यातील पर्सिस्टंट सिस्टीम या कंपनीचे सर्वेसर्वा आनंद देशपांडे यांच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोवण्यात आलाय. देशपांडे यांचा गुरुवारी जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत समावेश करण्यात आलाय. सर्वसामान्य कुटुंबामधून पुढे आलेलं नेतृत्व म्हणून देशपांडे यांच्याकडे पाहिलं जातं. देशपांडे यांच्या कंपनीमधील संपत्तीचा वाटा हा एक अब्ज डॉलर्सहून अधिक असल्याचं ‘फोर्ब्स’ने म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविद्यालयीन शिक्षणानंतर अमेरिकेमध्ये चांगल्या नोकरीच्या आशेने गेलेले देशपांडे वयाच्या २८ व्या वर्षी पुन्हा मायदेश परत आले आणि त्यांनी स्वत:चा उद्योग सुरु केला. अमेरिकेमध्ये काम करताना जमवलेले २१ हजार डॉलर्सच्या भांडवलावर त्यांनी उद्योग सुरु केला. यामध्ये त्यांना त्यांचे वडील दादा देशपांडे यांनीही काही आर्थिक मदत केली आणि पार्सिस्टंट कंपनीची स्थापना झाली. १९९० मध्ये त्यांनी आपल्या कंपनीची स्थापना केली.

फोर्ब्सनुसार आज पर्सिस्टंटचे वार्षिक उत्पन्न हे ५६.५ कोटी डॉलर इतकं आहे. ही कंपनी डेटा मॅनेजमेंट, डिजिटसल इंजिनीअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात काम करते. देशपांडे यांनी पाच सहकाऱ्यांच्या मदतीने सुरु केलेल्या या कंपनीत आता १४ हजारांहून अधिक इंजीनीयर्स आणि कर्मचारी काम करतात. जगभरातील ४५ देशांमधील कर्मचारी थेट किंवा अप्रत्यक्षरित्या या कंपनीचा भाग आहेत. मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने आपल्या आर्थिक उलाढालीमध्ये १३ टक्क्यांची वाढ नोंदवली असून नफ्यामधील वाढ ही ३८ टक्के इतकी आहे. समोर आलेल्या माहितीनुसार देशापांडेंच्या कल्पनेतून साकारलेल्या या कंपनीने मागील आर्थिक वर्षात ६.२५ कोटी डॉलर्सचा नफा मिळवला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये १४९ टक्क्यांनी वाढ झाल्याने कंपनीला नफा होतोय.

केवळ आयटीच नाही सामाजिक बांधिलकी जपण्याचं कामही देशपांडे करत आहेत. त्यांनी सहा वर्षांपूर्वी ‘दे आसरा’ नावाच्या फाउंडेशनची स्थापना केली आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मराठी उद्योजक कमी असतात अशी टीका वारंवार होताना दिसते. अशा परिस्थीमध्ये देशपांडे कुटुंबियांच्या माध्यमातून केले जाणारे हे प्रयत्न कौतुकास्पदच म्हणावे लागतील.

सामाजिक बांधिलकी जपणारं आणखीन एक उदाहरण सांगायचं झाल्यास नुकतेच देशपांडे कुटुंबाने पुणे पोलिसांच्या कर्मचाऱ्यांसाठी ४५० घरं असणारा एक प्रकल्प स्वत:च्या पैशातून उभारुन दिलाय. देशपांडे यांच्या कंपनीच्या नावाचा म्हणजेच पर्सिस्टन्सचा मराठीमध्ये सातत्य असा अर्थ होतो. हेच सातत्य त्यांच्या औद्योगिक भरभराटीबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या कामामध्येही दिसून येत आहे. देशपांडे यांच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्त इच्छाशक्तीच्या जोरावर मोठी भरारी घेऊ शकतो हेच दिसून येत असल्याचं म्हणता येईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forbes indian tech founder anand deshpande persistence pays off and makes him a billionaire scsg