Foreigner confronts man for asking phone number from wife in Amritsar Video : देशात कुठेही फिरताना महिलांना अडचणींचा सामना करावा लागल्याच्या अनेक घटना समोर येत राहातात. पंजाबमधील अमृतसर येथे असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. एक परदेशी पर्यटक आणि अमृतसरमधील एका व्यक्तीच्या संभाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये परदेशी पर्यटक पत्नीला फोन नंबर मागणाऱ्या तरुणाला जाब विचारताना आणि चांगलेच फैलावर घेताना दिसून येत आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, तो व्यक्ती त्यांच्याजवळ आला आणि थेट तिचा नंबर मागू लागला, जे तिला खूपच आगंतुक आणि अयोग्य वाटले.
“तू तिला फोन नंबर का मागत आहेस? तू जे काही केलं आहेस ते खूपच विचित्र आहे. तू खूप विचित्र आहेस. तू एकटी असलेल्या अनोळखी महिलेकडे जाणे आणि अवघ्या दोन सेकंदात तिला फोन नंबर मागणे, हे खूपच विचित्र आहे. तू पुन्हा असे करू नको, ठीक आहे. तू थोडा वेडा आहेस,” असे तो परदेशी पर्यटक त्या व्यक्तीला म्हणताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.
यावर प्रतिसाद म्हणून त्या व्यक्तीने तो विद्यार्थी असल्याचा दावा केला आणि परिस्थिती शांत करण्यासाठी महिलेला बहीण म्हणू लागला आणि अचानक तेथून निघून गेला.
या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. अनेकांनी यावर संताप आणि निराशा व्यक्त केला आहे. तर काहीनी अशा घटनांमुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि आदरातिथ्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या शहराची प्रतिमा मलिन होऊ शकते. अनेकांनी त्या व्यक्तीच्या वर्तनाबद्दल संताप व्यक्त केला असून अशा घटना अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे.
एका वापरकर्त्याने कमेंट केली आहे की, “मला आश्चर्य वाटले नाही, गेल्या वर्षी मी माझ्या तेव्हाच्या गर्लफ्रेंडबरोबर रोड ट्रिपला गेलो असताना, लोक तिला सतत फोटोसाठी विचारत होते आणि हे सर्व मी तिच्यासोबत असताना! जर ती एकटी असती तर परिस्थिती किती भीषण असती याची मी फक्त कल्पनाच करू शकतो. त्यापैकी काही जणांनी तर माझ्याकडे तिच्याशी ‘मैत्री’ करून देण्याबद्दल विचारले.”
दुसऱ्या एका वापरकर्त्याने कमेंट केली की, “मी देखील नुकतेच एका मैत्रिणीबाबत अशाच अनुभवातून गेलो, जी नुकतीच भारत भेटीवर येऊन गेली. मूर्ख लोक तिच्याकडे येऊन सेल्फीसाठी विचारत, अगदी महिलादेखील! मला त्यांना उद्धटपणे दूर घालवून द्यावे लागायचे. मला तिला समजावून सांगावे लागले की अशा प्रकारे लोकांकडे दुर्लक्ष करणे अगदी सामान्य आहे. अशा प्रकारच्या घटना देशाची प्रतिमा खराब होते!”
तिसरा एक यूजर म्हणाला की, “म्हणजे एखाद्या अनोळखी व्यक्तीला त्रास दिल्यानंतर, तुम्ही फक्त ‘सिस्टर’ म्हणून पळून जाऊ शकता?”
यापूर्वी देखील असाच एक प्रकार समोर आला होता, ज्यामध्ये एका डच महिलेला दिल्ली ते आग्रा रेल्वे प्रवासादरम्यान त्रासाला समोरे जावे लागले होते.