Demonetisation नोटाबंदी आणि जीएसटीवरुन GST माजी पंतप्रधान मनमोहन सिंग Former PM Manmohan Singh यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. नोटाबंदी आणि जीएसटीने अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त केले असून या निर्णयावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना करचुकवे ठरवणार का ? असा सवाल मनमोहन सिंग यांनी विचारला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मंगळवारी मनमोहन सिंग मैदानात उतरले. अहमदाबादमधील कार्यक्रमात सिंग यांनी जीएसटी, नोटाबंदीवरुन प्रहार केला. ८ नोव्हेंबर हा भारतीय लोकशाहीतील काळा दिवस आहे. जगभरात कोणत्याही देशाने असा घातकी निर्णय घेतला नव्हता, अशी टीका त्यांनी केली. कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नोटाबंदीसारखा निर्णय घेणे चुकीचे होते, असे त्यांनी सांगितले. नोटाबंदीचा सर्वसामान्यांना फटका बसला. नोटाबंदी आणि जीएसटी हे निर्णय भारतीय अर्थव्यवस्थेवरील दुहेरी आघात होते, यामुळे छोट्या व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले, असे त्यांनी म्हटले आहे.

नोटाबंदीचा निर्णय ऐकून मला हादरा बसला होता. सकल राष्ट्रीय उत्पन्नावरही नोटाबंदीचा परिणाम दिसला. हा निर्णय म्हणजे संघटित लूटच होती, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. गेल्या वर्षभरात सर्वाधिक मृत्यू हे रेल्वे अपघातांमध्ये झाले. तरी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना रेल्वेमधील पायाभूत सुविधांचा विकास करण्याऐवजी बुलेट ट्रेन आणायची आहे, असे त्यांनी नमूद केले. गुजरात सरकार गेल्या काही वर्षांमध्ये आदिवासी समाजाची मदत करण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.

महात्मा गांधी यांची आठवणही मनमोहन सिंग यांनी करुन दिली. जेव्हा तुम्ही संभ्रमावस्थेत असता तेव्हा तुम्ही गरिबांचा विचार करावा, असे गांधीजी सांगायचे. नोटाबंदीचा निर्णय घेताना मोदींनी गरीबांचा विचार केला होता का? तुम्ही असंघटित क्षेत्राचा विचार केलेला का, मोदींनी निर्णय घेताना गांधीजींचा या शिकवणीचा विचार केला असता तर आज गरिबांना या संकटाचा सामना करावा लागला नसता, असे त्यांनी सांगितले. प्रत्येकाला देशविरोधी किंवा कर चुकवणारा ठरवून लोकशाही मूल्यांना धक्का दिला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आम्ही १० वर्षांत १४ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले, असे ते म्हणालेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former pm manmohan singh slams modi government does questioning gst and demonetisation make one a tax evader