पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी तुलना करताना केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी या दोघांचा डीएनए एकच असल्याचे म्हटले आहे. या दोघांनाही विज्ञानात संशोधनाची आवड असल्याचेही ते म्हणाले.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वैज्ञानिक समुदायाच्या सामाजिक जबाबदाऱ्यांमध्ये अधिक रस आहे. यावेळी मी आणखी एका महान पंतप्रधानाची आठवण काढतो ज्यांचे डीएनए सध्याच्या पंतप्रधानांसारखे आहेत. वाजपेयी हे केवळ कवीच नव्हे तर मनापासून वैज्ञानिक तसेच संशोधक होते.’, असे हर्षवर्धन यावेळी म्हणाले.
हर्षवर्धन म्हणाले, वाजपेयी एक असे पंतप्रधान होते ज्यांनी ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेत ‘जय विज्ञान’ या घोषणेची भर घातली. वाजपेयींनी पंतप्रधान झाल्यानंतर दोनच महिन्यांत भारताला अणू क्षमता असलेल्या राष्ट्रांच्या समूहामध्ये आणून ठेवले होते. मोदींनी वाजपेयींकडून अनेक चांगल्या गोष्टी वारशाने मिळवल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘वैज्ञानिकांनी आपल्या संशोधनाद्वारे सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनात बदल घडून यावा यासाठी काम करावे, या दृष्टीनेच त्यांनी आपल्या संशोधनावर लक्ष्य केंद्रित करावे असेही हर्षवर्धन यावेळी म्हणाले.