देशाला हादरा दिलेल्या दिल्ली सामूहिक बलात्कारप्रकरणातील चारही नराधमांना साकेत न्यायालयाने मरेपर्यंत फाशी ठोठावली आहे. १६ डिसेंबर २०१२ रोजी या चौघांनी २३ वर्षीय तरुणीवर अत्यंत अमानुषपणे सामूहिक बलात्कार आणि मारहाण केली होती. यात गंभीर जखमी झालेल्या या तरुणीने उपचारादरम्यान प्राण गमावला होता. अत्यंत घृणास्पद आणि शहारा आणणारे हे कृत्य ‘अत्यंत अपवादात्मक गुन्हा’च असून दोषींना मृत्युदंडच योग्य आहे, असे न्यायालयाने नमूद केले. या निर्णयाबाबत पीडित युवतीच्या कुटुंबियांनी आणि राजकीय क्षेत्रानेही समाधान व्यक्त केले आहे. दोषी ठरलेल्या चौघाही जणांच्या वकिलांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा मिळणे गरजेचे होते, असा शेराही न्यायालयाने निर्णय देताना नोंदवला.मुकेश (२६), अक्षय ठाकूर (२८), पवन गुप्ता (१९) आणि विनय शर्मा (२०) या चौघांनाही फाशीची शिक्षा सुनावताना, असाहाय्य महिलेवर असा अत्याचार करणे लांच्छनास्पद असून त्याला पायबंद घालण्यासाठी मृत्युदंडच योग्य असल्याचे न्यायमूर्तीनी नमूद केले. तसेच प्रत्येकी ५५,००० रुपये इतका आर्थिक दंडही ठोठावला.
अपवादात्मक अपराधच का?
गुन्हेगारांनी पीडित युवतीला बसमध्ये चढण्यास उद्युक्त केले. त्यानंतर तिच्यावर निर्घृणपणे सामूहिकरित्या बलात्कार केला. त्यानंतर पीडित युवतीने याबद्दल वाच्यता करू नये या उद्देशाने तिच्यावर अनन्वित आणि अमानुष अत्याचारही करण्यात आले. शिवाय दिल्लीच्या गारठय़ात तिला  चालत्या बसमधून बाहेर टाकण्यात आले. या गुन्ह्य़ांमधून त्यांची विकृत प्रवृत्ती दिसून येते. पीडित मुलीच्या शारीरिक अवयवांना झालेली इजा पाहता या गुन्हेगारांना कठोर शासन करणेच गरजेचे होते.
न्या. योगेश खन्ना

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सौम्य शिक्षेचा विचार नाही..
आरोपींची लहान वये लक्षात घेता तसेच त्यांची आर्थिक-सामाजिक परिस्थिती लक्षात घेता त्यांना सुधारण्याची संधी देणे कायद्याला धरून झाले असतेही, मात्र त्यांनी ज्या क्रूरपणे बलात्कार केला, त्यानंतर नृशंसपणे हल्ला केला ते पाहता सौम्य शिक्षा देणे अशक्य आहे, असे न्यायमूर्तीनी  नमूद केले. मृत्यूदंडाच्या शिक्षा सुनावताना वय हा  निर्णायक घटक ठरू शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने वारंवार बजावले आहे.  कसाब याच्या बाबतीतही सर्वोच्च न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा कायम राखली होती, असे न्या. योगेश खन्ना यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four convicts in december 16 gangrape and murder case awarded death penalty by delhi court