करोना व्हायरसच्या भीतीमुळे मुंबईतून बाहेरगावी जाण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. त्यातच आता क्वॉरंटाइनचा शिक्का असलेले काही रुग्णही रेल्वेमध्ये आढळू लागले आहेत. अशा रुग्णांपैकी काहींना आता करोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. मुंबईहून जबलपूरला जाणाऱ्या गोदान एक्स्प्रेसमध्ये एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या चौघांना करोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
१६ मार्च रोजी या चौघांनी मुंबई-जबलपूर गोदान एक्स्प्रेसच्या एसी डब्यातून प्रवास केला होता. हे चौघेही बी-१ डब्यातून प्रवास करत होते. त्यांचा करोना रिपोर्ट शनिवारी पॉझिटिव्ह आल्याचं टि्वट रेल्वे मंत्रालयांनं केलं आहे. हे चौघंही दुबई येथून भारतात आले होते, अशी माहितीही रेल्वे मंत्रालयानं दिली आहे.
क्वॉरंटाइनचा शिक्का असलेले दोन प्रवासी बंगळुरू-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करताना आढळले होते. त्यांना रेल्वेतून उतरवण्यात आले आहे. उर्वरित सर्वांना सॅनिटायझर्सचं वाटप करण्यात आलं. रेल्वेत आता अनेक क्वॉरंटाइन लोक पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आवश्यकता असेल तरच प्रवास करा, असं आवाहनही रेल्वे खात्यानं केलं आहे.
रेल्वेतून प्रवास करणारे ८ निघाले पॉझिटिव्ह
१३ मार्च रोजी दिल्लीहून रामगुंडम जाणाऱ्या एपी संपर्क क्रांती एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या ८ जणांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं टि्वटद्वारे दिली आहे.