पीटीआय, नवी दिल्ली
जागतिक पातळीवर मृत्युदर ६७ टक्क्यांनी कमी झाला आहे, मात्र तरुणांमधील मृत्युदर त्या प्रमाणात कमी झालेला नाही असा निष्कर्ष ‘द लान्सेट जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात काढण्यात आला आहे. आत्महत्या, अमली पदार्थांचे अतिसेवन आणि अतिप्रमाणात मद्यसेवन ही तरुणांमधील मृत्यूंची मुख्य कारणे असल्याचे आढळून आले आहे.
‘द लान्सेट’च्या पाहणीनुसार, २०२३ या वर्षात चीनमध्ये सर्वाधिक म्हणजे १.०७ कोटी मृत्यू झाले. त्यापाठोपाठ भारतात ९८.५ लाख आणि अमेरिकेत ३० लाखांपेक्षा अधिक मृत्यूंची नोंद करण्यात आली. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत क्रमवारी लावली असता मृत्युदरामध्ये भारताचा ७३वा क्रमांक नोंदवण्यात आला. तर, चीनचा १६६वा आणि अमेरिकेचा १६०वा क्रमांक आहे. करोना महासाथीशी संबंधित मृत्यूमध्येही भारत पहिल्या पाच देशांमध्ये आहे.
संशोधनाचे स्वरूप
‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज (जीबीडी) २०२३’ या जागतिक पातळीवर करण्यात आलेल्या संशोधनात ३ लाख १० हजारांपेक्षा जास्त सूत्रांकडून मिळालेल्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे. या अभ्यासात जगभरातील १४ हजारांपेक्षा जास्त संशोधक आणि तज्ज्ञ सहभागी झाले होते.
अभ्यासकांची निरीक्षणे
– उच्च रक्तदाब, वायुप्रदूषण, धुम्रपान आणि लठ्ठपणा यासारख्या ८८ जोखमीच्या घटकांवर उपाययोजना केल्यास जगातील मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमाण जवळपास निम्म्याने कमी करणे शक्य
– मधुमेह, अतिचिंता आणि नैराश्य यात झपाट्याने वाढ; लवकर मृत्यू आणि अपंगत्वाचे पहिल्या १०मधील कारणे
– १९५०पासून आयुर्मानात २० वर्षांपेक्षा जास्त कालावधीने वाढ
– करोना महासाथीपूर्वी महिलांचे सरासरी आयुर्मान ७६ तर पुरुषांचे सरासरी आयुर्मान ७१ वर्षे
जगातील वृद्धांच्या लोकसंख्येत होणारी झपाट्याने वाढ आणि नवनवीन जोखमीचे घटक ही नवीन युगातील जागतिक आरोग्यासमोरील मोठी आव्हाने आहेत. – डॉ. ख्रिस्तोफर मरे, ‘युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन’