इराकमध्ये दहशतवाद्यांच्या कैदेत असलेले ३९ भारतीय जिवंत असल्याची आशा आहे. इराकच्या आयएसआयएस या संघटनेच्या दहशतवाद्यांनी भारतीयांना बंधक बनवले होते. त्यांची हत्या करण्यात आल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले असले, तरी सरकारच्या माहितीनुसार भारतीय बंधक जिवंत असल्याची आशा आहे, असे निवेदन केंद्रीय विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत आज दिले. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने हा मुद्दा संसदेत उपस्थित केला होता. त्यावर सरकारने स्पष्टीकरण दिले.
कट्टर इस्लामी दहशतवादी संघटना समजल्या जाणाऱ्या आयएसआयएसने ३९ भारतीयांना कैद केले होते. त्यांची हत्या झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर यासंबंधी लोकसभेत ज्योतिरादित्य शिंदे तर राज्यसभेत आनंद शर्मा यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. दहशतवाद्यांविरोधात सरकार कारवाई करणार का, असाही प्रश्न उभय नेत्यांनी विचारला.
याच दहशतवाद्यांच्या कैदेत असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर प्रसारमाध्यमांनी ३९ भारतीयांची हत्या झाल्याचे वृत्त पसरले होते. परंतु यासंबंधी अधिकृत माहिती नसल्याचे सांगत संबंधित वृत्त निराधार असल्याचे सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले. भारत सरकारला विविध सहा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कैदेत असलेले भारतीय जिवंत असल्याचा दावा स्वराज यांनी केला. अर्थात एका कुणाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवण्याऐवजी सरकारने सहा जणांकडून ही माहिती मिळवली आहे. त्यामुळे या माहितीची विश्वसनीयता निश्चित जास्त आहे. दहशतवाद्यांशी चर्चा करण्यात अर्थ नसतो. त्यामुळे सरकारने चर्चेऐवजी अन्य मार्गानी सरकार ‘त्या’ भारतीयांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. लवकरच या मोहिमेला यश मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
विरोधी पक्षांचे निवेदन आम्हाला मान्य नाही. प्रत्येक भारतीयाची जबाबदारी सरकारवर आहे. त्यामुळे इराकमधील भारतीयांना शोधून त्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गेल्या पाच महिन्यांपासून दहशतवाद्यांच्या कैदेत असलेल्या भारतीयांना सोडवण्यासाठी एक वरिष्ठ आयएफएस अधिकारी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या मदतीला दोन अतिरिक्त अधिकारी याकामी नियुक्त करण्यात आले आहेत. इराकमध्ये दहशतवाद्यांच्या कैदेत सर्वाधिक पंजाबी आहेत. राज्यसभेत बोलताना मात्र स्वराज यांनी काहीसे विसंगत विधान केले. संसदेने प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्ताऐवजी सरकारवर विश्वास ठेवावा. अद्याप ‘त्या’ भारतीयांची हत्या झाल्याचे कुठेही निश्चित झालेले नाही. त्यामुळे ते जिवंत असावेत, असा सरकारचा कयास असल्याचे स्वराज म्हणाल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt believes 39 indians held hostage by isis in iraq still alive efforts on to trace them sushma swaraj