Greater Noida Dowry Murder Case : ग्रेटर नोएडा येथे एका महिलेची हुंड्यासाठी हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आता नवीन माहिती समोर येत आहे. दिल्लीतील एका रुग्णालयात घेऊन जात असताना गुरुवारी या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान यापूर्वी तिला मारहाण करतानाचा आणि ती पेटलेल्या अवस्थेत घरातील पायऱ्या उतरत असतानाचा व्हिडीओ देखील समोर आला होता. आता या महिलेच्या लहान मुलाने त्याच्या वडिलांनी आणि आजीने त्याच्या आईला मारहाण करून पेटवून दिल्याचा प्रकार पाहिल्याची बाब समोर आली आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, या लहान मुलाने सांगितले की, “त्यांनी पहिल्यांदा आईच्या अंगावर काहीतरी टाकलं, त्यानंतर कानशिलात लगावली आणि त्यानंतर लायटरने पेटवून दिलं.” इतकेच नाही तर त्याला तुझ्या वडिलांनी तिची हत्या केली का असे विचारल्यावर त्याने हो असे उत्तर दिले.

नेमकं प्रकरण काय?

या हुंड्यासाठी हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव निक्की होते. ९ वर्षांपूर्वी तिचे लग्न ग्रेटर नौएडा येथील सिरसामध्ये राहणाऱ्या विपीन भाटी याच्याशी झाले होते.

या महिलेची मोठी बहीण कांचन हिचे देखील लग्न याच कुटुंबात झाले आहे. तिने दावा केला की निक्कीला ३५ लाख हुंडा न दिल्याबद्दल तिच्या डोळ्यांसमोर जिवंत जाळण्यात आले. इतकेच नाही तर तिने सासरच्या लोकांनी तिला देखील मारहाण केल्याचा दावा कांचनने केला आहे.

“आमचा छळ केला जात होता, आमच्या सासरच्यांनी लग्नाच्यावेळी आम्हाला अमुक-तमुक गोष्टी मिळाल्या नाहीत असे नेहमी बोलत असत. त्यांनी आम्हाला घरून ३६ लाख रुपये आणण्यास सांगितले. गुरूवारी पहाटे दीड ते ४ पर्यंत मला देखील मारहाण झाली. ते मला म्हणाले की, ‘एकासाठी हुंडा मिळाला, दुसऱ्याचे काय? तू मेलेली बरी. आम्ही पुन्हा लग्न करू,” असे कांचनने सांगितले.

तिने निक्कीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण ती वाचवू शकली नाही, असेही कांचनने सांगितले. “माझी इच्छा आहे की माझ्या बहिणीला जो त्रास दिला तसाच त्रास त्यांना देखील सहन करावा लागावा, असे कांचन म्हणाली.

एका समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पीडितेचा पती आणि सासू तिला केसांना पकडून मारहाण करताना पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये पीडित महिल्या भाजल्याच्या जखमांसह जमिनीवर बसलेली पाहायला मिळत आहे.

तिला शेजाऱ्यांच्या मगतीने फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात पाठवण्यात आले. पण घेऊन जाताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.

पीडित महिलेच्या तक्रारीनंतर कसना पोलीस ठाण्यात पीडितेचा पती, दीर रोहित भाटी, सासू दया आणि सासरा सतवीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेच्या पतीला अटक करण्यात आले असून पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान निक्कीला न्याय मिळावा अशी मागणी करत कसना पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने लोक जमले होते.