गुजरातमधील पटेल समाजाचा नेता हार्दिक पटेल आणि त्याचे वकील बी. एम. मंगुकिया यांच्यावर गुजरात उच्च न्यायालयाने गुरुवारी कडक शब्दांत ताशेरे ओढले. हार्दिक पटेल ‘गायब’ झाल्याचे कारण पुढे करीत सोमवारी मध्यरात्री उच्च न्यायालयात याचिका दाखल केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न याचिकाकर्त्यांनी केला, असे सकृतदर्शनी दिसत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्याचबरोबर मध्यरात्री सुनावणी करायला लावली आणि हार्दिक पटेल पुन्हा सापडल्यानंतर न्यायालयाला कळवण्याची तसदीही घेतली नाही, यामुळे न्यायालयाने मंगुकियांवर ताशेरे ओढले. मंगुकिया यांनी विनाशर्थ न्यायालयाची माफी मागितली पाहिजे, असेही स्पष्ट केले.
न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि न्या. के. जे. ठाकेर यांच्या खंडपीठाने मंगुकियांवर ताशेरे ओढले. त्याचबरोबर २९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी याचिकेत केलेले दावे सिद्ध करा, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या दिवशी कोणत्याही स्थिती सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयाच्या कामकाजाचा गैरवापर केल्याबद्दल न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली. सुनावणी होण्याअगोदरच तुम्ही वाहिन्यांना मुलाखती दिल्या. त्याचबरोबर आम्ही केलेल्या सूचनेचा विचार न करता त्या दिवशी सुनावणीनंतर तुम्ही परत माध्यमांना प्रतिक्रिया दिली. याबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.