बलात्कार आणि हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमची (Gurmeet Ram Rahim) २१ दिवसांच्या फरलोवर सुटका झाली. गुडगावमध्ये कुटुंबीयांना भेटण्यासाठी हरियाणा सरकारने ही परवानगी दिली. त्याला रोहतकच्या सुनारिया कारागृहात ठेवण्यात आले होते. यानंतर आता हरियाणा सरकारने याच गुरमीत राम रहीमला खलिस्तानवाद्यांपासून धोका असल्याचं कारण देत झेड प्लस सुरक्षा (Z Plus Security) दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हरियाणा सरकारने गुरमीत राम रहीमची सुरक्षा वाढवताना एडीजीपी आणि सीआयडीच्या अहवालाचा संदर्भ देत त्याला धोका असल्याचं म्हटलं. यात खलिस्तानी गुरमीतला नुकसान पोहचू शकतात, असं म्हटल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी होऊन शिक्षा भोगणारा गुरमीत राम रहीम झेड प्लस सुरक्षेत वावरणार आहे. एडीजी सीआयडीकडून रोहतक पोलीस आयुक्तांना पत्र पाठवण्यात आलं होतं. यात गृहमंत्रालयाकडून आलेल्या अहवालानुसार गुरमीतला खलिस्तान्यांचा धोका असल्याचं म्हटलं होतं.

राम रहीमची पंजाबमधील निवडणुकीच्या १३ दिवस आधी सुटका

दरम्यान, राम रहीमची पंजाबमधील निवडणुकीच्या १३ दिवस आधी ७ फेब्रुवारीला सुटका झाली. पंजाबमध्ये डेराचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर आहेत. दरम्यान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी, जर गुरमीत राम रहीमला पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी फरलो मिळाला असेल तर हा निव्वळ योगायोग आहे. त्याचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही, असे म्हटले होते.

२० फेब्रुवारी रोजी पंजाबच्या सर्व ११७ जागांसाठी मतदान होत आहे. पंजाबमध्ये डेराच्या राजकारणाला खूप महत्त्व आहे. माळव्यापासून ते दोआबापर्यंत पसरलेले डेरे राजकीय विजय-पराजयात मोठी भूमिका बजावत आहेत. निवडणूक तज्ज्ञांच्या मते, राम रहीमच्या डेरा सच्चा सौदाने २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत पडद्याआडून शिरोमणी अकाली दलाला (एसएडी) पाठिंबा दिला होता. या कारणास्तव, दणदणीत पराभव होऊनही, अकालींना सुमारे २५ टक्के मते मिळवता आली.

विधानसभेच्या ६९ जागांवर राम रहीमच्या अनुयायांचा प्रभाव

पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिरसा डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला मिळालेला पॅरोल राजकारणाशी जोडला जात आहे. कारण पंजाबमध्ये डेरा सच्चा सौदाचे अनुयायी मोठ्या संख्येने आहेत आणि ते डेराच्या सूचनेनुसार मतदान करतात. पंजाबच्या राजकारणात माळवा प्रदेश महत्त्वाची भूमिका बजावतो. या भागात विधानसभेच्या ६९ जागा असून या भागात राम रहीमच्या अनुयायांची संख्या लक्षणीय आहे. संपूर्ण राज्यात जवळपास तीन डझन जागांवर डेरा सच्चा सौदाचे अनुयायी आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gurmeet ram rahim get z plus security amid threat of khalistani pbs