Gurpatwant Singh Pannun: खलिस्तान समर्थक फुटीरतावादी नेता गुरपतवंत सिंग पन्नू याने भारतीय सैन्यातील शीख सैनिकांना आवाहन केले आहे की, जर भारताने पाकिस्तानशी युद्ध केले तर देशासाठी लढू नका. ‘शीख फॉर जस्टिस’ या संघटनेच्या नेत्याने असा दावाही केला की, युद्ध झाल्यास सीमेच्या भारतातील पंजाबी पाकिस्तानी सैन्याला ‘लंगर’ देतील.

“जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर ते भारत आणि मोदींसाठी शेवटचे युद्ध असेल. भारताच्या बाजूचे पंजाबी पाकिस्तानी सैन्यासाठी लंगर देतील,” असे पन्नू याने एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे, असे वृत्त डॉनने दिले आहे.

शीख सैनिकांना दिलेल्या संदेशात पन्नू म्हणाला की, पाकिस्तान हा शत्रू नाही तर एक मैत्रीपूर्ण देश आहे जो ‘पंजाब मुक्त केल्यानंतर आपला शेजारी’ असेल.

भारताविरोधात बरळला

“नरेंद्र मोदींच्या राष्ट्रविरोधी युद्धाला आता नाकारण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानविरुद्ध लढू नका. पाकिस्तान तुमचा शत्रू नाही. पाकिस्तान शीख लोकांसाठी आणि खलिस्तानसाठी एक मैत्रीपूर्ण देश असेल आणि राहील. एकदा आपण पंजाब मुक्त केला की, पाकिस्तान आपला शेजारी असेल,” असे फुटीरतावादी नेता पन्नू पुढे म्हणाला.

गेल्या आठवड्यात जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यात एका नेपाळी पर्यटकाचाही समावेश होता.

गुरपतवंत सिंग पन्नू हताश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सशस्त्र दलांना या भ्याड हल्ल्याला देशाच्या प्रत्युत्तराची वेळ, लक्ष्य आणि पद्धत निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. या पार्श्वभूमीवर गुरपतवंत सिंग पन्नू शीख सैनिकांना चिथावण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. शीख आणि पंजाबी लोकांबद्दलचे त्यांचे दावे निराधार आणि हताश करणारे आहेत.

पंजाबमध्ये दहशतवादी कट उधळून लावला

नुकतेच सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पंजाब पोलिसांच्या समन्वयाने अमृतसर जिल्ह्यातील भरोपाल गावाजवळ दहशतवादी कट उधळून लावला असून, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा साठा जप्त केला आहे. बीएसएफ इंटेलिजेंस विंगने दिलेल्या माहितीच्या आधारे, बुधवारी संध्याकाळी संयुक्त शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान, सुरक्षा दलांना दोन हातबॉम्ब, तीन पिस्तूल, सहा मॅगझिन आणि ५० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. जप्त केलेली शस्त्रे आणि स्फोटके पुढील तपासासाठी स्थानिक पोलिसांकडे सोपवण्यात आली आहेत.