देशातील बहुचर्चित ज्ञानवापी मशीद प्रकरणावरील सुनावणी आता १४ एप्रिलला होणार आहे. वरिष्ठ अधिवक्ते हुजेफा अहमदी यांनी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जेबी पारदीवाला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्याची विनंती केली होती. रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण लवकरात लवकर हाती घेण्याची विनंती करण्यात आली होती. या विनंतीला हिरवा कंदील देत सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याची सुनावणी १४ एप्रिल रोजी सूचीबद्ध केली आहे. ज्ञानवापी मशिदीच्या आवारात वुजू करण्यास (वुजू ही शरीराचे काही अवयव स्वच्छ करण्याची इस्लामिक प्रक्रिया आहे, किंवा एक प्रकारचा शुद्धीकरण विधी) परवानगी देण्याबाबत मुस्लिम पक्षकारांना अंतरिम अर्ज दाखल करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.
हुजेफा अहमदी यांनी म्हटले की “हा रमजानचा महिना आहे त्यामुळे मशिदीच्या आवारात नमाज अदा करता आली पाहिजे.” त्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी यासंदर्भात अंतरिम अर्ज दाखल करण्यास सांगितले. अहमदी खंडपीठासमोर म्हणाले की, “तुमच्या आदेशानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. तसेच मागील बाजूस बाथरूम आहे, तेदेखील सील करण्यात आलं आहे.”
या प्रकरणाची सुनावणी २१ एप्रिल रोजी होणार होती. परंतु अहमदी खंडपीठासमोर म्हणाले की, सध्या रमजानचा महिना सुरू आहे, त्यामुळे तुम्ही जर ही सुनावणी आधी घेतली तर बरं होईल. त्यावर न्यायमूर्तींनी होकार दर्शवत ही सुनावणी १४ एप्रिल घेऊ असे सांगितले. तसेच तुम्ही वजू करण्यासंदर्भात मूळ याचिकेत अंतरिम अर्ज का दाखल करत नाही? असेही न्यायमूर्ती म्हणाले. चंद्रचूड यांनी सांगितले की, आम्ही १४ एप्रिल ही तारीख अंतरिम याचिकेसाठी सूचीबद्ध करतो. तुम्ही केवळ एक अंतरिम अर्ज दाखल करा. एका कनिष्ट वकिलाकडून त्यात उल्लेख करून घ्या. त्यानंतर आपण १४ तारखेला सुनावणी घेऊ.