न्यूयॉर्क, वॉशिंग्टन : अमेरिकेतील ‘एच १ बी’ व्हिसा आणि ग्रीन कार्ड देण्याच्या प्रक्रियेत ट्रम्प प्रशासन बदल करण्याच्या विचारात आहे. अमेरिकेचे वाणिज्यमंत्री होवार्ड लुटनिक यांनी याबाबत माहिती दिली. भारतातील बहुतांश माहिती-तंत्रज्ञान (आयटी) कर्मचारी या व्हिसावर अमेरिकेत जातात.
लुटनिक म्हणाले, ‘‘ सध्या ‘एच १ बी’साठीची प्रक्रिया बदलणे सुरू आहे. आम्ही ते बदलणार आहोत. त्यात मी सहभागी आहे. सध्याची व्हिसा प्रक्रिया भयंकर आहे. ट्रम्प प्रशासन ग्रीन कार्ड प्रक्रियाही बदलणार आहे. या कार्डमुळे अमेरिकेमध्ये कायमस्वरुपी नागरिकत्व मिळते.’’
‘एच १ बी’ व्हिसाचा सर्वाधिक लाभ भारतीयांना होतो. भारतातील अनेक कुशल तरुण या व्हिसावर अमेरिकेत येतात.
‘एच १ बी’ व्हिसा हा एक घोटाळा आहे. परदेशी कर्मचाऱ्यांना अमेरिकेतील नोकरीच्या संधी त्यामुळे उपलब्ध होतात. अमेरिकेतील उद्योगांचे अमेरिकेतील लोकांना नोकरी देण्याला प्राधान्य हवे. आता अमेरिकींना नोकरीवर घेण्याची वेळ आली आहे. – होवार्ड लुटनिक, वाणिज्यमंत्री, अमेरिका
परदेशी विद्यार्थ्यांसाठी मुदत निश्चित होणार
परदेशी विद्यार्थ्यांसाठी आणि माध्यमांसाठी असलेल्या व्हिसांना ट्रम्प प्रशासन मर्यादा घालण्याचा विचार करीत आहे. अमेरिकेतील गृहसुरक्षा मंत्रालयाने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक काढले आहे. या प्रस्तावानुसार काही व्हिसाधारकांसाठी निवासाचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला आहे. १९७८पासून परदेशी विद्यार्थी (एफ व्हिसाधारक) अनिश्चित काळासाठी अमेरिकेत दाखल होत आहेत. त्यासाठी व्हिसावर ‘ड्युरेशन ऑफ स्टेटस’ असा शिक्का असतो. असे विद्यार्थी कुठल्याही तपासणीशिवाय अनिश्चित काळासाठी अमेरिकेत राहू शकतात. या सवलतीचा अनेक परदेशी विद्यार्थी गैरफायदा घेत असून, अनेक जण कायमस्वरुपी विद्यार्थी म्हणून अमेरिकेत राहत आहेत, असे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे.