पीटीआय, डेहराडून

डेहराडूनलगतची संरक्षण प्रशिक्षण अकादमी सोमवारी राज्यात मुसळधार पावसाने कोसळली, तर भूस्खलनाच्या मालिकेमुळे पाच जण बेपत्ता झाले.
बद्रीनाथ, केदारनाथ आणि गंगोत्री मंदिरांकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरही दरडी कोसळल्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.लालपुलाजवळ सोंग नदीच्या काठावर असलेल्या डेहराडून संरक्षण अकादमीची (डेहराडून डिफेन्स अॅकॅडमी) इमारत सोमवारी सकाळी कोसळल्याचे टिहरीचे उपविभागीय दंडाधिकारी आशिष घिलडियाल यांनी सांगितले. ही इमारत आधीच रिकामी करण्यात आल्याने कोणीही जखमी झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. एका खासगी संस्थेची १५ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली ही इमारत होती, असे माजी जिल्हा पंचायत सदस्य अखिलेश उनियाल यांनी सांगितले. मुसळधार पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी भूस्खलन झाले आहे.

पौडी जिल्ह्यातील लक्ष्मणझुला भागात दरड कोसळल्याने चार-पाच जण बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त होत आहे. मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन त्याचा ढिगारा परिसरातील एका ‘रिसॉर्ट’वर पडला. त्या खाली चार-पाच जण अडकल्याची माहिती पौडीच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षक श्वेता चोबे यांनी दिली. बचाव आणि मदत पथक घटनास्थळी पोहोचले असून, शोध मोहीम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून आढावा

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली आणि अधिकाऱ्यांना चोवीस तास सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. टिहरी, हरिद्वार आणि ऋषिकेशमध्ये गंगा धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. पावसामुळे बहुतांश नद्या दुथडी भरून वाहत होत्या. रुद्रप्रयाग, श्रीनगर आणि देवप्रयाग येथे अलकनंदा, मंदाकिनी आदी नद्याही धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याचे येथील आपत्ती नियंत्रण कक्षाने सांगितले. भूस्खलनामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग अनेक ठिकाणी ठप्प पडला आहे. पिपळकोटीजवळ एक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती आहे. चमोली जिल्ह्यात अलकनंदा आणि तिच्या उपनद्या पिंडार, नंदाकिनी आणि बिर्ही यासह डझनभर नद्यांच्या काठावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. भूस्खलनामुळे पिंडरची उपनदी प्राणमतीलाही पूर आला होता.