Harshavardhan Chitale becomes New CEO of Hero MotoCorp : हिरो मोटोकॉर्प या देशातील सर्वात मोठ्या दुचाकी उत्पादक कंपनीने हर्षवर्धन चितळे यांची कंपनीच्या सीईओपदी (मुख्य कार्यकारी अधिकारी) नियुक्ती जाहीर केली आहे. ५ जानेवारी २०२६ पासून चितळे पदभार स्वीकारतील. संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर कंपनीने ८ सप्टेंबर रोजी एक निवेदन जारी करत चितळे यांच्या नावाची घोषणा केली आहे.

हर्षवर्धन चितळे यांनी मागील तीन दशकांहून अधिक काळ ऑटोमेशन, लायटिंग, आयटी सेवा, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन यांसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम केलं आहे. त्यांनी सिग्निफाय (Signify), फिलिप्स लायटिंग इंडिया (Philips Lighting India), एचसीएल इन्फोसिस्टिम्स (HCL Infosystems), आणि (हनीवेल ऑटोमेशन इंडिया) Honeywell Automation India या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केलं आहे.

सिग्नफाय व फिलिप्सच्या यशात मोठा वाटा

चितळे यांनी तब्बल ५ अब्ज युरोंची उलाढाल असलेल्या सिग्निफाय या कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहिलं असून ७० देशांमधील १२,००० कर्मचाऱ्यांचं नेतृत्व केलं आहे. या कंपनीत असताना त्यांनी उत्पादन विकास आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनवर भर दिला. तर, फिलिप्स लायटिंग इंडिया या कंपनीत असताना त्यांनी कंपनीचं बाजारातील पहिलं स्थान अधिक मजबूत केलं.

कंपनीला चितळेंकडून मोठ्या अपेक्षा

हवर्षवर्धन चितळे यांची सीईओपदी नियुक्ती केल्यानंतर याविषयी प्रतिक्रिया देताना हिरो मोटॉकॉर्पचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. पवन मुंजाळ म्हणाले, “चितळे यांनी आतापर्यंत ज्या कंपन्यांमध्ये काम केलं आहे त्या कंपन्यांची वृद्धी आणि जागतिक पातळीवर परिवर्तन घडवून आणण्यात मोठी भूमिका बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हिरो मोटोकॉर्प इलेक्ट्रिक आणि नव्याने उदयाला येत असलेल्या मोबिलिटी, प्रीमियम प्रोडक्ट्स, डिजिटायझेशनच्या बाबतीत प्रगती करेल आणि शास्वततेच्या दिशेने वेगाने वाटचाल करेल यात आम्हाला शंका नाही.”

हर्षवर्धन चितळे यांनी आयआयटी दिल्लीमधून पदवी मिळवली आहे. Director’s Gold Medal मिळवणाऱ्या चितळे यांनी ईव्ही, क्लीन एनर्जी, हेल्थ-टेक, अ‍ॅग्री-टेक क्षेत्रांमध्ये अ‍ॅन्जेल इन्व्हेस्टर (स्टार्टअप किंवा नवीन व्यवसायाला सुरुवातीच्या टप्प्यात आर्थिक मदत करणारे गुंतवणूकदार) म्हणूनही सक्रीय सहभाग घेतला आहे.

दरम्यान, चितळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सध्याचे हिरो मोटोकॉर्पचे कार्यकारी सीईओ विक्रम कसबेकर हे चितळेंबरोबर काम करून कंपनीचं कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मदत करतील. कसबेकर हे कार्यकारी संचालक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून कंपनीत कार्यरत राहतील.