पीटीआय, वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि ‘फर्स्ट लेडी’ जिल बायडेन यांनी ‘व्हाइट हाऊस’मध्ये केलेले आपले स्वागत हा १४० कोटी भारतीय नागरिकांचा सन्मान आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. तर २१व्या शतकात भारत आणि अमेरिकेचे नाते हे सर्वात घट्ट आहे, असे बायडेन म्हणाले.

अमेरिकेच्या पहिल्या अधिकृत दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान मोदी यांचे गुरूवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८च्या सुमारास पंतप्रधान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत निवासस्थानी आगमन झाले. त्यानंतर या दौऱ्यातील सर्वात महत्त्वाची द्विपक्षीय चर्चा सुरू होण्यापूर्वी स्वागत समारंभात दोघांनी उपस्थितांना संबोधित केले. दोन्ही देशांच्या राष्ट्रगीतांनी या कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरूवातीला मोदी यांचे स्वागत करताना बायडेन म्हणाले, की आरोग्य, वातावरण बदल आणि रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यामुळे उद्भविलेल्या जागतिक परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी दोन्ही देश एकत्रितपणे काम करीत आहेत. हिंदू-प्रशांत क्षेत्रामध्ये मुक्त आणि सुरक्षित वातावरण राहावे, यासाठी भारताच्या सहकार्याने क्वाड (भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रगट) अधिक मजबूत झाल्याचेही बायडेन यांनी नमूद केले.

या स्वागताचा स्वीकार करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की बायडेन यांच्यासोबत होऊ घातलेली द्वीपक्षीय चर्चा नेहमीप्रमाणे सकारात्मक आणि उपयुक्त ठरेल. जागतिक शांतता, स्थैर्य आणि विकासासाठी एकत्रितपणे काम करण्यास भारत आणि अमेरिका कटिबद्ध आहेत. भारतीय वंशाच्या नागरिकांनी आपली बुद्धिमत्ता आणि कठोर मेहनतीच्या जोरावर अमेरिकेमध्ये भारताची मान उंचावली आहे. हे नागरिक हीच अमेरिका-भारत संबंधांची खरी ताकद आहे, असे मोदी म्हणाले. करोनानंतरच्या काळात जगाची घडी बदलली आहे. भारत-अमेरिकेची मैत्री ही सगळय़ा जगाची ताकद वाढविणारी ठरेल, असा विश्वासही मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.