Honor Killing उच्चवर्णीय मुलीवर प्रेम असलेल्या तामिळनाडूच्या दलित सॉफ्टवेअर इंजिनिअरची हत्या करण्यात आली आहे. कवीन सेल्वा गणेश हा टीसीएस या नामांकित फर्ममध्ये काम करत होता. या २७ वर्षीय तरुणाला भरदिवसा कोयत्याचे वार करुन ठार करण्यात आलं आहे. या प्रकरणात पोलीस दाम्पत्याचा मुलाला अटक करण्यात आली आहे. सूरजित या तरुणाला अटक करण्यात आली आहे. तू खालच्या जातीचा आहेस माझ्या बहिणीवर प्रेम करायची तुझी हिंमतच कशी झाली? असा जाब विचारत कवीनच्या प्रेयसीच्या भावानेच कोयत्याचे वार करुन त्याची हत्या केली.

नेमकी घटना काय घडली?

रविवारी कवीन त्याच्या मैत्रिणीला म्हणजेच सुबाशिनीला भेटायला केटीसी नगर या भागात पोहचला होता. त्यावेळी सुबाशिनीचा भाऊ सुरजीत त्याला भेटायला आला. त्याने कवीनला सांगितलं की आई-बाबांना तुझ्याशी बोलायचं आहे. कवीनला त्याने विश्वासात घेतलं. ज्यानंतर कवीन त्याच्याबरोबर बाईकवर बसून निघाला. पुढे गेल्यानंतर काही वेळातच सूरजीतने बाईक थांबवली. त्यानंतर कवीनवर खेकसला आणि म्हणाला तू खालच्या जातीचा आहेस तू माझ्या बहिणीवर प्रेम करण्याची हिंमतच कशी केलीस? असं म्हणत सूरजीतने पाठीमागे लपवलेला कोयता काढला आणि त्याने कवीनवर वार केले. कवीन जीव वाचवून पळाला खरा. पण २०० मीटर पेक्षा जास्त अंतर सूरजीतने त्याचा पाठलाग केला आणि त्याच्यावर वार केले. ज्यात कवीनचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना एका रुग्णालयाजवळ घडली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी ही घटना पाहिली. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

सूरजीतचे आई वडील पोलीस

आरोपी सूरजीतचे आई वडील हे दोघंही पोलीस खात्यात सब इन्स्पेक्टर पदावर कार्यरत आहेत. कवीन आणि सुबाशिनी यांचं एकमेकांवरचं प्रेम या दोघांनाही मान्य नव्हतं. त्यांनी सुबाशिनीला भेटू नकोस म्हणून काही वेळा कवीनला धमकावलं होतं. दरम्यान सूरजीतने घटनास्थळावरुन पळ काढला. पण नंतर तो स्वतःच पलायमकोट्टई पोलीस ठाण्यात पोहचला आणि त्याने आत्मसर्मपण केलं. सूरजीतच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कवीनच्या कुटुंबाने मृतदेह स्वीकारण्यास दिला नकार

दरम्यान कवीनचा मृतदेह घेण्यास त्याच्या नातेवाईकांनी नकार दिला आहे. कवीनची आई एस तमिळसेल्वीने आरोप केला आहे की आरोपीचे आई वडील पोलीस आहेत. त्यामुळे ते दोघंही या प्रकरणांत दबाव टाकू शकतात. दरम्यान या घटनेने तामिळनाडू हादरलं आहे. या घटनेनंतर दलित संघटनांनी आंदोलन करत सूरजीतच्या आई वडिलांनाही अटक झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.