Iran Attack on Qatar US Air Base : इस्रायल आणि इराणमधील संघर्ष आता काही प्रमाणात निवाळला असल्याची परिस्थिती दिसून येत आहे. मात्र, इस्रायल आणि इराणच्या संघर्षात अमेरिकेनेही उडी घेत तेहरानमधील आण्विक केंद्रांना लक्ष्य करत ते नष्ट केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर इराणनेही अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणने मोठा हल्ला केला होता.

इराणने कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर ६ पेक्षा जास्त क्षेपणास्त्र डागले होते. या हल्ल्यात अमेरिकेच्या लष्करी तळांचं मोठं नुकसान झाल्याचा दावा इराणनने केला होता, तर कोणतंही नुकसान झालं नसल्याचं अमेरिकेने सांगितलं होतं. दरम्यान, इराणच्या हल्ल्यात अमेरिकेच्या हवाई तळाचं खरंच नुकसान झालं होतं का? झालं असेल तर किती नुकसान झालं? याबाबत सॅटेलाइट फोटोमधून मोठी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, असोसिएटेड प्रेसने सॅटेलाइट फोटोच्या माध्यमातून केलेल्या विश्लेषणामधून अशी माहिती समोर आली आहे की “कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर इराणने केलेल्या हल्ल्यात अमेरिकेच्या हवाई तळांवरील भूगर्भीय घुमटासह हवाई तळाचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे.” या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

या अहवालानंतर अमेरिकेच्या पेंटागॉनचे प्रवक्ते शॉन पार्नेल यांनी शुक्रवारी सांगितलं की, “इराणच्या क्षेपणास्त्रामुळे कतारमधील अमेरिकन लष्करी तळावरील उपकरणे आणि संरचनांचे किरकोळ नुकसान झालं आहे. तसेच हवाई तळ अजूनही पूर्णपणे कार्यरत आहे. अमेरिका आपल्या कतारी भागीदारांच्या सहकार्याने आपले प्रादेशिक सुरक्षा अभियान राबवत आहे”, असं त्यांनी म्हटलं आहे.

सॅटेलाइट फोटोमधून काय माहिती समोर आली?

दरम्यान, असोसिएटेड प्रेसने जारी केलेल्या माहितीनुसार सॅटेलाइट फोटोमधून इराणने केलेल्या हल्ल्याचा परिणाम झाल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. समोर आलेल्या फोटोमधून २३ जून रोजी अमेरिकेच्या एअरबेसवर एक भूगर्भीय घुमट होता. मात्र, हल्ल्यानंतर हा भूगर्भीय घुमट पूर्णपणे नष्ट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हे बांधण्यासाठी अमेरिकेने २०१५ मध्ये तब्बल १५ दशलक्ष डॉलर्स खर्च केले होते.