अलीकडे रशियात वॅग्नर या खासगी लष्कराने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात बंडखोरी केली होती. वॅग्नर या लष्कराची निर्मिती पुतिन यांनीच केली आहे. येवगिनी प्रिगोझीन हे वॅग्नर लष्कराचे प्रमुख आहेत. पण, वॅग्नर लष्कराने केलेल्या बंडानंतर येवगिनी प्रिगोझीन सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. येवगिनी प्रिगोझीन यांना विष दिलं गेलं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी टोलेबाजी केली आहे.

“येवगिनी प्रिगोझीनच्या ठावठिकाणाबद्दल अमेरिकेला माहिती नाही. पण, भाडोत्री लष्कराच्या प्रमुखाला विष दिले जाऊ शकते,” असं विधान जो बायडेन यांनी केलं आहे. ते गुरुवारी ‘व्हाईट हाऊस’ येथे बोलत होते.

हेही वाचा : फ्रान्सच्या सर्वोच्च किताबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी सन्मानित; अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याकडून ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ प्रदान

जो बायडेन म्हणाले, “जर मी त्याठिकाणी असतो, तर काय खातोय याकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं असते. कारण, मी जेवणाच्या मेन्यूवर लक्ष ठेवत असतो. मात्र, गंमतीचा भाग बाजूला ठेवा. रशियात प्रिगोझीनचे भवितव्य काय आहे, याची निश्चित सर्वांना माहिती आहे.”

हेही वाचा : फ्रान्सच्या ‘बॅस्टिल डे’ परेडमध्ये महाराष्ट्राचा सुपुत्र सुशील शिंदे, पंतप्रधान मोदींसमोर सादर केल्या ‘राफेल’च्या कवायती

दरम्यान, अमेरिकेच्या माजी जनरलने येवगिनी प्रिगोझीनला तुरुंगात डांबल्याचा दावा केला आहे. अमेरिकेचे माजी जनरल रॉबर्ट अब्राम्स म्हणाले, “येवगिनी प्रिगोझीन बंड शमल्यानंतर कुठेही दिसले नाहीत. मला वाटतं की येवगिनी प्रिगोझीन जिवंत आहेत. जर, ते जिवंत असतील, तर त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं असणार.”