सलामीवीर जॉनी बेअरस्टोचं आक्रमक शतक आणि त्याला जेसन रॉय, बेन स्टोक्स आणि जो रुट यांनी दिलेली साथ या जोरावर यजमान इंग्लंडने भारताविरुद्धच्या सामन्यात ३३७ धावांपर्यंत मजल मारली. ३३८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने दमदार शतक ठोकले. पण त्याचे शतक व्यर्थ ठरले. भारताला सामना ३१ धावांनी गमवावा लागला. पण शतकी खेळी करत रोहितने एक विक्रम केला.
रोहित शर्माचे हे या विश्वचषक स्पर्धेतील तिसरे शतक ठरले. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या दोन संघांशी खेळताना रोहितने शतक झळकावले होते. त्यानंतर आता रोहितने इंग्लंडविरुद्ध शतक केले. रोहितचे हे एकदिवसीय कारकिर्दीतील २५ वे शतक ठोकले. सर्वात जलद २५ शतके ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला. रोहितने २५ शतके ठोकण्यासाठी २०६ डाव खेळले. या यादीत आफ्रिकेचा हाशिम आमला (१५१ डाव) अव्वल आहे. तर भारताचा कर्णधार विराट कोहली (१६२) दुसऱ्या स्थानी आहे.
रोहित शर्माने १०२ धावांची खेळी केली. पण त्याच्या खेळीत एकही षटकाराचा समावेश नव्हता.तसेच शतक झाल्यावर लगेचच बाद होण्याची ही त्याची तिसरी वेळ ठरली. या आधी तो २००१ साली १०१ आणि २०१७ साली १०४ धावांवर बाद झाला होता.
Smallest ODI century by Rohit Sharma:
101* vs Sri Lanka in 2010
102 vs England, Today
104 vs Sri Lanka in 2017This is also the first ODI century for Rohit without a SIX. #CWC19 #ENGvIND
— Sampath Bandarupalli (@SampathStats) June 30, 2019
दरम्यान, ३३८ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. लोकेश राहुल एकही धाव न काढता माघारी परतला. कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्माने शतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. रोहित-विराटची जोडी भारताला विजय मिळवून देईल असं वाटत असतानाच लियाम प्लंकेटने विराटला माघारी धाडलं. त्याने ६६ धावांची खेळी केली. यानंतर रोहित शर्माने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रोहितने आपलं शतकही पूर्ण केलं. मात्र इतर कोणत्याही खेळाडूने जबाबदारीने खेळ केला नाही. त्यामुळे भारताला स्पर्धेतील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडकडून प्लंकेटने ३ तर वोक्सने २ बळी घेतले.