‘जर हिंदू हा धोकादायक आणि अत्याचार करणारा समुदाय असेल तर सर्व हिंदू विस्थापित हिंदू शांतताप्रिय कसे?’, असा सवाल अमेरिकन तत्वज्ञ, विचारवंत आणि भारतातील हिंदू संस्कृतीचे अभ्यासक डॉ. डेव्हिड फ्रॉली यांनी उपस्थित केला आहे. हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर वामदेव शास्त्री या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या डेव्हिड यांनी दुसऱ्या प्रदेशात विस्थापित होणाऱ्या हिंदू समुदायाने कधीच त्या प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचा किंवा राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण केला नाही असे मत व्यक्त केले आहे.

पद्मभूषण पुरस्कार विजेते डेव्हिड यांनी ट्विट करुन हिंदूंना धोकादायक आणि अत्याचार करणारे आहेत अशी टिका करणाऱ्यांना काही सवाल केले आहेत.

‘काही लोक आता हिंदू हे धोकादायक व अत्याचारी समुदाय असल्याचा आरोप करताना दिसतात. असे असेल तर जगभरातील विस्थापित हिंदू शांततेचा पुरस्कार करणारे, उत्पादक (उद्योगी) आणि सर्वांकडून आदर कसा मिळवणारे कसे? त्याचप्रमाणे विस्थापित हिंदूंमुळे कधीच एखाद्या देशातील कायदा सुव्यवस्था किंवा राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे ऐकिवात कसे आले नाही?’, असे ट्विट डेव्हिड यांनी केले आहे.

या ट्विटबरोबर डेव्हिड यांनी हिंदू धर्मावर होणारी टिका ही राजकीय हेतूने प्रेरित होत असल्याचे मतही दुसऱ्या एका ट्विटमध्ये व्यक्त केले आहे.

डेव्हिड यांच्या ट्विटला एका दिवसामध्ये साडेतीन हजारहून अधिक जणांनी रिट्विट केले असून दहा हजारहून अधिक जणांनी लाईक केले आहे. हिंदू संस्कृती, फल ज्योतिष आणि आयुर्वेद या विषयांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या डेव्हिड यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे. ते अमेरिकेतील साण्टा शहरामध्ये अमेरिकन वैदिक इन्स्टीट्यूट या संस्थेच्या माध्यमातून वैदिक पुराण आणि आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करण्याचे काम करतात.