पीटीआय, इस्लामाबाद : पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने शुक्रवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना देशाच्या भांडारातील (तोशाखाना) भेटवस्तू विक्रीतून मिळालेले उत्पन्न दडवल्याप्रकरणी पाच वर्षांसाठी अपात्र ठरवले. या काळात इम्रान खान यांना कोणत्याही सार्वजनिक पदाची जबाबदारी घेता येणार नाही.

खान यांच्यावर विदेशी नेत्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून मिळालेली रक्कम उघड न केल्याचा आरोप होता. यामुळे पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) प्रमुख असलेले ७० वर्षीय इम्रान खान पाच वर्षांसाठी पाकिस्तानच्या ‘पार्लमेंट’चे सदस्य होऊ शकत नाहीत. ऑगस्टमध्ये सत्ताधारी आघाडी सरकारच्या खासदारांनी खान यांच्याविरोधात पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे (ईसीपी) या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. ‘तोशाखाना’ मधून सवलतीच्या दरात खरेदी केलेल्या भेटवस्तू वाढीव किमतीला विकून त्याद्वारे आलेले उत्पन्न दडवल्याबद्दल खान यांना अपात्र ठरवण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर आयोगाने १९ सप्टेंबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुलतान राजा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने इस्लामाबादमधील आयोगाच्या सचिवालयात खान यांच्याविरुद्ध हा निकाल दिला. खंडपीठाच्या सर्व पाच सदस्यांनी शुक्रवारी एकमताने खान हे भ्रष्ट व्यवहारात दोषी ठरवत त्यांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरवले. मात्र, घोषणेच्या वेळी पंजाबमधील सदस्य गैरहजर होते.

खान यांच्यावर भ्रष्ट व्यवहार कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, असेही आयोगाने म्हटले आहे. या निर्णयाला इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे खान यांचा पक्ष ‘पीटीआय’चे सरचिटणीस असद उमर यांनी सांगितले. या पक्षाचे ज्येष्ठ नेते फवाद चौधरी यांनी हा निर्णय फेटाळून, इम्रान समर्थकांना या निर्णयाच्या निषेधासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाचे आवाहन केले. देशात अनेक ठिकाणी निदर्शने सुरू झाली आहेत. हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. इम्रान खान यांच्या ‘पीटीआय’ पक्षाने सोमवारी झालेल्या पोटनिवडणुकीत ‘नॅशनल असेंब्ली’च्या आठपैकी सहा आणि प्रांतीय विधानसभेच्या तीनपैकी दोन जागा जिंकल्या. या विजयाच्या पार्श्वभूमीवर बंदीचा हा निर्णय झाल्यानंतर इम्रान यांचे व ‘पीटीआय’ समर्थक नाराज झाले आहेत.

काय आहे प्रकरण?

२०१८ मध्ये सत्तेवर आलेल्या इम्रान यांना शासकीय भेटी-गाठींमध्ये अरब शासकांकडून महागडय़ा भेटवस्तू मिळाल्या होत्या. त्या ‘तोशाखाना’त जमा करण्यात आल्या होत्या. नंतर इम्रान यांनी कायदेशीर तरतुदीनुसार या भेटवस्तू सवलतीच्या दरात खरेदी केल्या व जास्त किमतीला विकून नफा कमावल्याचा आरोप आहे. इम्रान यांनी आयोगाला सुनावणी दरम्यान सांगितले होते, की त्यांना सुमारे दोन कोटी एक लाख रुपयांना ‘तोशाखाना’तून खरेदी केलेल्या या भेटवस्तूंच्या विक्रीतून सुमारे त्यांना पाच कोटी आठ लाख मिळाले. त्यांनी खरेदी केलेल्या भेटवस्तूंमध्ये ग्राफ कंपनीचे महागडे घडय़ाळ, एक मौल्यवान पेन, एक अंगठी आणि रोलेक्स कंपनीच्या चार घडय़ाळांसह इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. त्याच्या विरोधकांच्या दाव्यानुसार, खान यांनी प्राप्तिकर परताव्यात या भेटवस्तूंच्या विक्रीपोटी आलेले उत्पन्न न दाखवता दडवले होते.