Imran Khan’s PTI Ban : राज्यविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचा ठपका ठेवत पाकिस्तानच्या तहरीक ए इन्साफ या पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे या पक्षाचे अध्यक्ष आहेत. पाकिस्तानचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अताउल्ला तरार यांनी यांसदर्भात माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अताउल्ला तरार म्हणाले, ९ मे रोजी झालेल्या घटनांमध्ये माजी सत्ताधारी पक्षाचा सहभाग आणि पीटीआयच्या माजी किंवा सध्याच्या नेत्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबरोबर पाकिस्तानचा करार मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. (Imran Khan’s PTI Ban)

“आमचा विश्वास आहे की पीटीआयवर बंदी घालण्यासाठी आमच्याकडे अनेक पुरावे आहेत”, असं अताउल्ला उतार म्हणाले. “पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या विरोधी पक्षावर बंदी (Imran Khan’s PTI Ban) घालण्याचा मुद्दा मंत्रिमंडळात आणि गरज पडल्यास शक्यतो सर्वोच्च न्यायालयात आणला जाईल”, असंही अताउल्ला उतार म्हणाले.

हेही वाचा >> १० महिन्यांनी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान इम्रान खान यांना बघून लोकांना बसला धक्का; पांढरे केस-दाढी आणि चेहऱ्यावर..

पीटीआय पक्ष काय आहे?

पाकिस्तान तहरीक ए इन्साफ हा पाकिस्तानमधील एक राजकीय पक्ष आहे. याची स्थापना १९९६ मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर आणि राजकारणी इम्रान खान यांनी केली होती. त्यांनी २०१८-२०२२ पर्यंत देशाचे पंतप्रधान म्हणूनही काम केले. पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीबरोबर तीन प्रमुख पाकिस्तानी राजकीय पक्षांमध्ये पीटीआचा क्रमांक लागतो. २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लिमध्ये प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने सर्वांत मोठा पक्ष आहे. परंतु, एप्रिल २०२२ मध्ये विश्वासदर्शक ठरावादरम्यान त्यांचं सरकार पडलं. पाकिस्तान सरकारने गेल्या आठवड्यात दिलेल्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विलोकन याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले.

इम्रान खान सध्या तुरुंगात

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान सध्या तुरुंगात आहेत. पाकिस्तानातील एका न्यायालयाने रविवारी इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना भ्रष्टराचाराच्या नव्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आठ दिवसांच्या कोठडीसाठी भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. जिल्हा न्यायालायने शनिवारी या दोघांचीही गैर इस्लामिक विवाह प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. मात्र, लगेच एनएबीने त्यांना अटक केली.

अविश्वास प्रस्तावाद्वारे पदावरून हटवलेले पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान बनल्यानंतर खान यांना पाकिस्तानमध्येचा अनेक खटल्यांना सामोरे जावे लागले होते. खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्यावर १९० दशलक्ष पौंडच्या भ्रष्टाचार प्रकरणात रिअल इस्टेट टायकूनकडून कोट्यवधी रुपयांची जमीन लाच स्वरूपात घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या खान यांनी काही आठवड्यांपूर्वी इस्लामाबाद उच्च न्यायालयात आपल्या विरुद्ध झालेल्या कारवाईलाच आव्हान दिले होते. (Imran Khan’s PTI Ban)

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imran khans pti ban will the once ruling party be banned now sgk