केरळच्या व्हिक्टोरिया महाविद्यालयातील ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’ (एसएफआय) या डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी निवृत्तीची भेट म्हणून मुख्याध्यापिकेची कबर तयार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी मुख्याध्यापिका डॉ. टी.एन. सरसू यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. टी.एन. सरसू ३१ मार्च रोजी महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाल्या. डाव्या विचारांच्या अखिल केरळ शासकीय महाविद्यालय शिक्षक संघटनेतील काहीजणांच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांनी हे कृत्य केल्याचा दावा सरसू यांनी केला आहे. सरसू यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत एसएफआयच्या आठ विद्यार्थ्यांची नावे नमूद करण्यात आली असून, या विद्यार्थ्यांनी ३१ मार्चला महाविद्यालयाच्या आवारात आपली प्रतिकात्मक कबर तयार करून ती फुलांनी सजविल्याचे म्हटले आहे. ३१ मार्चला सकाळी सात वाजता काही विद्यार्थ्यांनी हा प्रकार माझ्या निदर्शनास आणून दिला. मी मुख्याध्यापक असताना या विद्यार्थ्यांच्या काही अवाजवी मागण्या मान्य केल्या नव्हत्या. याचा राग या विद्यार्थ्यांच्या मनात असल्याचा दावाही टी.एन.सरसू यांनी केला. दरम्यान, केरळमधील भाजपच्या राज्य अध्यक्षांकडून याप्रकरणाचा निषेध करण्यात आला असून, हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे असल्याचे त्यांनी म्हटले. निवडणूक आयोगाचे माजी अधिकारी टी.एन. शेषन, मेट्रोमॅन ई. श्रीधरन व्हिक्टोरिया महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kerala students prepare grave for principal as retirement gift