मंचेरियाल : शारीरिकदृष्टय़ा विकलांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या निवृत्तिवेतनात दरमहा एक हजार रुपयांची वाढ करण्याची घोषणा तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी शुक्रवारी केली.शारीरिकदृष्टय़ा अपंग व्यक्तींना या वाढीनंतर दरमहा ४,११६ रुपयांची रक्कम मिळेल, असे मंचेरियाल येथील जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी टाळय़ांच्या कडकडाटात सांगितले.
राज्यातील भारत राष्ट्र समितीचे सरकार लोकांच्या कल्याणासाठी काम करत असून, राज्यातील खाणकाम साठय़ांमध्ये सिंगारेनी कोळसा खाणकामाचा विस्तार करण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सिंगारेनी कोळसा खाणीबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेस व भाजप हे त्यांच्या हितसंबंधांसाठी खाणींचे आकुंचन करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसने कंपनीच्या भागभांडवलाचा ४९ टक्के भाग केंद्राला विकला आहे, तर खासगीकरणाचा विचार करत हे प्रमाण आणखी वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. एससीएल अंतर्गत येणारे खाण युनिट नफा मिळवत आहे. तेलंगणच्या निर्मितीनंतर कंपनी नफा मिळवत असून, या वर्षी तो २,१६४ कोटी रुपये आहे, असे राव यांनी सांगितले.