अमेरिकेने सर्जियो गोर यांना अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून नेमलं आहे. सोमवारी अमेरिकेचे राजदूत म्हणून ते पदभार स्वीकारतील. नवी दिल्ली या ठिकाणी असलेल्या अमेरिकेच्या दुतावासात ते पदभार स्वीकारतील. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्जियो गोर यांची भेट झाली. त्यावेळी गोर म्हणाले डोनाल्ड ट्रम्प म्हणतात नरेंद्र मोदी हे महान आहेत तसंच ते माझे चांगले मित्र आहेत. सर्जियो गोर असंही म्हणाले की अमेरिका आणि भारत यांचे संबंध महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ही भेट महत्त्वाची ठरली आहे.
सर्जियो गोर काय म्हणाले?
सर्जियो गोर यांनी नरेंद्र मोदी यांना महान असं म्हटलं आहे. दरम्यान ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणं हा एक अद्भुत अनुभव होता. आम्ही डिफेन्स, व्यापार, टेक्नॉलॉजी सह द्वीपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. तसंच खनिजांचं महत्त्व या विषयावरही चर्चा झाली. सर्जियो गोर हे सध्या सहा दिवसांसाठी दिल्ली दौऱ्यावर आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सर्जियो गोर यांच्याशी भेट झाल्यानंतर पोस्ट केली आहे. अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयातशुल्क लादलं आहे. त्याबाबत अमेरिकेची आणि भारताची चर्चा सुरु आहे. या दरम्यान गोर यांनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचं ठरलं आहे.
नरेंद्र मोदींची पोस्ट काय?
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांचं मी स्वागत करतो. मला विश्वास आहे की त्यांचा कार्यकाळ हा भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध आणि भागिदारी यांच्यासाठी महत्त्वाचा असेल. या बैठकीनंतर सर्जियो गोर यांनी पररराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचीही भेट घेतली.
सर्जियो गोर सोमवारी स्वीकारणार पदभार
भारत-अमेरिका संबंधांबाबत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी चर्चा केली. अमेरिकेने भारतीय उत्पदनांवर लादलेल्या ५० टक्के आयातशुल्काबाबत आणि त्यामुळे दोन्ही देशांतील व्यापारविषयक संबंधांमध्ये आलेले वितुष्ट या पार्श्वभूमीवर या चर्चेला महत्त्व आले होते. मुळात गोर हे व्हाइट हाऊसमध्ये कर्मचारी विभागाचे संचालक असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू समजले जातात. त्यांची या पदासाठी ऑगस्टमध्येच शिफारस करण्यात आली होती. आता सोमवारी ते त्यांचा पदभार नवी दिल्लीत स्वीकारणार आहेत.