भारत आणि अरब राष्ट्रे यांच्यातील संबंध सौहार्दतेचे राहावेत यासाठी मध्य-पूर्व राष्ट्रांमध्ये स्थैर्य आणि शांतता असणे गरजेचे आहे. या राष्ट्रांमधील ‘अरब स्प्रिंग’ नंतरच्या घडामोडींकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. मात्र या देशांमधील वाढता मूलतत्त्ववाद चिंताजनक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी केले. या मूलतत्त्ववादामुळे समाजाची वीण उसवत चालली आहे आणि त्यामुळे प्रादेशिक स्थैर्य धोक्यात आले आहे, अशी जाणीवही स्वराज यांनी करून दिली.
भारताला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभ्या करायच्या आहेत. त्या दृष्टीने तेलसमृद्ध आखाती राष्ट्रांमधील गुंतवणूक आमच्यासाठी ‘निर्णायक’ ठरू शकते, असे उद्गार त्यांनी काढले. भारत आणि अरब जगत प्रसारमाध्यम व्यासपीठाचे उद्घाटन परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. अरब जगताशी असलेले भारताचे प्रदीर्घ मैत्रीपूर्ण संबंध लक्षात घेता, या राष्ट्रांमधील वाढता मूलतत्त्ववाद आणि दहशतवाद आम्हालाही चिंताजनक वाटतो. या भागात शांतता आणि सौहार्दता वाढीस लागावी, असेच आम्हालाही वाटते अशी भावना स्वराज यांनी व्यक्त केली.
देशांतर्गत कारभारात हस्तक्षेप न करणे, आगंतुकपणे काही न सुचविणे आणि परस्परांना सहकार्य ही भारतीय परराष्ट्र धोरणाची मूलतत्त्वे आहेत, असे सांगताना ‘आपले नशीब घडविणे हे मात्र अरब राष्ट्रांच्याच हाती आहे’ असे परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India concerned over rise of extremism in gulf says sushma swaraj