India Expels Pakistan Diplomat : भारत सरकारने नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात काम करत असलेल्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला अवांछित व्यक्ती (Persona Non Grata) म्हणून घोषित केलं आहे. त्या अधिकाऱ्याला २४ तासांच्या आत भारत सोडून जाण्यास सांगितलं आहे. अवांछित व्यक्ती म्हणजे प्रतिबंधित अथवा अनिष्ट व्यक्ती. केंद्र सरकारने यासंदर्भात पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अधिकृत निवेदन पाठवलं आहे. पाठोपाठ परराष्ट्र मंत्रालयाने याबाबतची माहिती जाहीर केली.

पर्सोना नॉन ग्राटा हा एक लॅटिन शब्द असून अवांछित व्यक्ती असा त्याचा अर्थ आहे. एखाद्या देशात कार्यरत असलेल्या परदेशी मुत्सद्दी अधिकाऱ्यांचा (प्रामुख्याने उच्चायुक्तालयातील अधिकारी) थेट राजकीय निषेध नोंदवण्यासाठी वापर केला जातो. या निषेधासाठी अशा प्रकारची कारवाई केली जाते. त्यानुसार सदर अधिकाऱ्याला काही तास अथवा काही दिवसांमध्ये देश सोडून जाण्यास सांगितलं जातं. अन्यथा त्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली जाते.

पर्सोना नॉन ग्राटा म्हणजे काय?

व्हिएन्ना कन्व्हेन्शन ऑन डिप्लोमॅटिक रिलेशन्सच्या (१९६१) कलम ९ अंतर्गत अशा प्रकारची कारवाई करता येते. त्यासाठी संबंधित देशाला स्पष्टीकरण देण्याची देखील आवश्यकता नसते. हेरगिरी किंवा यजमान देशाच्या हिताविरोधात कारवाई करताना आढळलेल्या परदेशी अधिकाऱ्यांवर अशा प्रकारची कारवाई केली जाते. हा एक प्रतिकात्मक निषेध असतो. एखादी व्यक्ती पर्सोना नॉन ग्राटा घोषित केल्यानंतर ती व्यक्ती तिचे राजनैतिक विशेषाधिकार गमावते.

जम्मू-काश्मीरबाबत तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीस भारताचा नकार

पहलगाममध्ये झालेला हल्ला आणि त्यानंतर भारत व पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलेला असताना केंद्र सरकारने पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याची हकालपट्टी केली आहे. तसेच जम्मू व काश्मीरबाबत कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीस भारत सरकारने साफ नकार दिला आहे. पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर भारताला परत करावा, त्यांच्या भूमीवरून दहशतवादाला दिलं जाणारं सहाय्य रोखावं, या दोन प्रमुख गोष्टी पाकिस्तानने मान्य केल्या तरच उभय देशांमध्ये चर्चा होऊ शकते असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आधीच स्पष्ट केलं आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले की “पाकिस्तानने बेकायदेशीरपणे बळकावलेला प्रदेश रिकामा करावा (पाकव्याप्त काश्मीरवरील ताबा सोडावा). तरच पाकिस्ताबरोबर द्विपक्षीय चर्चेतून इतर प्रश्न सोडवता येतील”. हीच भारताची गेल्या दशकभरापासूनची निती असून जयस्वाल यांनी सोमवारी तिचा पुनरुच्चार केला.