Donald Trump Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयाचा अनेक देशांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादलं आहे. काही दिवसांपूर्वी भारतावरही २५ टक्के टॅरिफ लादलं. त्यानंतर पुन्हा ६ ऑगस्ट रोजी भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादलं, म्हणजे भारतावरील एकूण आयातशुल्क आता ५० टक्क्यांवर पोहोचलं आहे.
ट्रम्प यांनी लादलेल्या या अतिरिक्त टॅरिफमुळे भारताला अमेरिकेत वस्तू निर्यात करण्यासाठी ५० टक्के टॅरिफ भरावा लागणार आहे. याचा भारतातील अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसणार असून हजारो नोकऱ्याही धोक्यात येऊ शकतात. दरम्यान, ट्रम्प यांच्या या टॅरिफच्या धोरणाचा अमेरिकेलाही भविष्यात फटका बसणार असल्याचा दावा केला जात आहे. नव्या टॅरिफमुळे अमेरिकेच्या जीडीपीची ग्रोथ घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमेरिकन डॉलरलाही याचा फटका बसू शकतो आणि महागाई देखील वाढू शकते असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींवर माजी परराष्ट्र राज्यमंत्री एमजे अकबर यांनी सविस्तर मत मांडलं आहे. तसेच ट्रम्प यांचं टॅरिफ धोरण हे सत्तेचं प्रदर्शन असल्यासारखं वाटत असून ते फार कमी दिवसांत अमेरिकेला कमकुवत करतील आणि अमेरिका लवकरच १९१४ नंतरच्या सर्वात कमकुवत टप्प्यावर पोहोचेल, असा दावा माजी परराष्ट्र राज्यमंत्री एमजे अकबर यांनी एएनआयशी बोलताना केला आहे.
माजी परराष्ट्र राज्यमंत्री एमजे अकबर काय म्हणाले?
“अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ धोरण हे सत्तेचं प्रदर्शन असल्यासारखं वाटतं. मात्र, फार कमी दिवसांत ते अमेरिकेला कमकुवत करतील. कारण डोनाल्ड ट्रम्प यांचं हे एक अतिशयोक्तीपूर्ण धोरण आहे असं वाटतं. हे असं धोरण आहे जे असं दर्शवतं की डोनाल्ड ट्रम्प मित्रांवर देखील विश्वास ठेवत नाहीत. पण तरीही पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या आर्थिक साम्राज्यवादाला प्रभावीपणे आव्हान दिलं आहे. मला वाटतं की ट्रम्प यांच्या हे लक्षात येत नाही की कोणत्याही कृतींचे परिणाम होतात. तसेच वापरलेली भाषा देखील व्यत्यय निर्माण करते. याचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय राजनैतिक कूटनीतिमध्ये त्यांनी वापरलेली भाषा जगाला मान्य नाही”, असं एमजे अकबर यांनी म्हटलं.
#WATCH | On 50% US tariff, Former MoS for External Affairs, MJ Akbar says, "Trump's tariffs seem at the moment an exercise in power, but in the very short run, they will weaken America. They will weaken America because this is a policy of overkill. This is also a policy that… pic.twitter.com/xTSr1k2Hnz
— ANI (@ANI) August 27, 2025
“पंतप्रधान मोदींनी दाखवून दिलं की ते वॉशिंग्टनकडे धाव घेणार नाहीत. जगाचं लक्ष आता या आठवड्यात होणाऱ्या पंतप्रधान मोदी, शी जिनपिंग आणि पुतिन यांच्यातील शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीवर केंद्रित आहे. मी स्वतः भाकीत करतो की अमेरिका लवकरच १९१४ नंतरच्या सर्वात कमकुवत टप्प्यावर पोहोचेल. कारण अमेरिकेने आता युरोपमधील आपल्या मित्रांचा विश्वास गमावला आहे. तसेच उर्वरित जगातील आपल्या मित्रांचा विश्वासही अमेरिकेने गमावला आहे, भारत त्यापैकीच एक आहे”, असं एमजे अकबर यांनी म्हटलं.