आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक अर्थसत्ता म्हणून नावारूपाला येत असलेल्या भारताकडे, जगातील सर्वाधिक मोठ्या आकाराची अर्थव्यवस्था बनण्याची क्षमता असल्याचे फेसबूकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीयल सँडबर्ग यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात २,००,००० कोटी इतके मुल्य असणारी भारतीय अर्थव्यवस्था रोजगार निर्मिती आणि विकासाचा वेग वाढविण्यात सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. देशात मोठ्या प्रमाणात असलेले लघु आणि मध्यम उद्योग भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे ठरत आहेत. सध्याच्या स्थितीचा विचार करायचा झाल्यास, जगातील अनेक अर्थव्यवस्थांपुढे बेरोजगारीची समस्या आ वासून उभी आहे. अमेरिका आणि अन्य विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थासुद्धा या समस्येशी झगडत आहेत. मात्र, भारताकडे पाहिल्यास देशातील लघु-मध्यम उदयोगक्षेत्रांमुळे देशातील रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळताना दिसते. भारतातील उद्योजक स्वतंत्र व्यवसायांच्या माध्यमातून अनेकांना रोजगार देत आहेत. इंटरनेटसारख्या सुविधांमुळे लोक आपापसांत जोडले गेले असून, या गोष्टीचा मोठा फायदा लघु-मध्यम क्षेत्रातील उद्योजकांना मिळत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  आगामी काळात जागतिक अर्थव्यवस्थांच्या वाटचालीबद्दल बोलताना, विकासाची अपेक्षित पातळी गाठण्यासाठी उद्योजकतेला चालना देणे गरजेचे असल्याचे सँडबर्ग यांनी सांगितले.