नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात निर्माण झालेला संघर्ष हा परंपरागत, म्हणजेच लष्करी स्वरूपाचा असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्राी यांनी दिल्याचे समजते.परराष्ट्र धोरणविषयक संसदेच्या स्थायी समितीसमोर ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि त्यानंतर घडलेल्या घटनांबाबत मिस्राी यांनी सोमवारी सादरीकरण केले. संघर्षादरम्यान दोन्ही देशांकडून अण्वस्त्रे वापरण्याचा प्रयत्न झाला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी कथितरित्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची पाकिस्तानला दिलेली माहिती, तुर्की व चीन या देशांनी पाकिस्तानला केलेली मदत, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली कथित मध्यस्थी, संघर्ष अचानक थांबवण्यामागील कारणे अशा विविध मुद्द्यांवर मिस्राी यांच्याकडून शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील स्थायी समितीने माहिती घेतली. ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले जात असल्याची माहिती भारताने दिली होती. मात्र, त्यानंतरच्या कारवाईची माहिती दिली गेली नव्हती. पाकिस्तानविरोधातील संघर्ष पाकिस्तानच्या विनंतीवरून थांबवण्यात आला. शस्त्रसंधीसाठी भारताने पुढाकार घेतलेला नव्हता, तर पाकिस्तानची विनंती भारताने मान्य केली.
या शस्त्रसंधीसाठी तिसऱ्या देशाने (अमेरिकेने) मध्यस्थी केली नसून संघर्ष द्विपक्षीय संवादातूनच थांबविण्यात आल्याचे सांगतानाच तुर्की व चीनने यापूर्वीही पाकिस्तानची बाजू घेतल्याचे मिस्राी यांनी सांगितल्याचे समजते. पाकिस्ताने भारताविरोधात चिनी बनावटीच्या क्षेपणास्त्रांचा वापर केल्याच्या मुद्द्यावर मिस्राींनी, चीनच्या क्षेपणास्त्रांच्या वापरामुळे भारताला काहीही फरक पडलेला नाही. पाकिस्तानकडून झालेले हल्ले भारताने ‘हॅमर’ केले असे उद्गार काढल्याची माहिती आहे. पाकिस्तानविरोधात भारताने ‘हॅमर’ या क्षेपणास्त्रांचा प्रभावी वापर केला होता, हे उल्लेखनीय. बैठकीला थरूर यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, काँग्रेसचे राजीव शुक्ला आणि दीपेंद्र हुडा, ‘ह्णएमआयएम’चे असदुद्दीन ओवैसी, भाजपच्या अपराजिता सारंगी आणि अरुण गोविल हे स्थायी समिती सदस्य उपस्थित होते.