पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिटन दौऱ्यावर आहेत. या दरम्यान Free Trade Agreement वर सह्या करण्यात आल्या आहेत. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की या करारानंतर भारत आणि ब्रिटन यांच्यात होणारा व्यापर ३४ मिलियन डॉलर्सने वाढेल. तसंच दोन्ही देशांचं आर्थिक नातं नवा आकार घेताना दिसेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या माहितीनुसार नव्या करारामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार, सुरक्षा, शिक्षण अशा मुद्द्यांवर UK India Vision 2035 रोड मॅप ठेवला जाईल. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनीही हा करार दोन्ही देशांच्या दृष्टीने एक ऐतिहासिक करार असल्याचं म्हटलं आहे.

या करारामुळे भारताला काय काय फायदे होणार?

१) या करारानंतर भारताच्या अनेक कंपन्या ब्रिटिश मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर जाऊ शकतील. त्यामुळे टॅरिफ कमी होईल आणि व्यवसाय करणं सोपं होईल.

२) या करारामुळे सॉफ्ट ड्रिंक, सौंदर्य प्रसाधनं, मेडिकल उपकरणं, आणि ऑटोमोबाइलवरील टॅरिफ १५ टक्क्यांहून थेट ३ टक्के इतका कमी होईल. त्यामुळे भारतात यासंबंधित उत्पादने स्वस्त होतील.

३) या मुक्त व्यापार करारामुळे भारतातून ब्रिटनला निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील शुल्क ब्रिटनकडून ९९ ते १०० टक्के कमी होईल.यामुळं भारतीय उत्पादनांना ब्रिटनचा बाजार खुला होईल. तर, भारताकडून देखील ब्रिटनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्क ८५ ते ९० टक्क्यांनी कमी होईल.

४) ब्रिटनमध्ये उत्पादित केलेलं ब्रिटीश मद्य आणि व्हिस्की याच्यावरील टॅरिफ आता १५० टक्क्यांवरुन ७५ टक्क्यांवर येईल. या दशकाच्या शेवटपर्यंत ते शुल्क ४० टक्क्यांवर येणं अपेक्षित आहे. भारताकडून ब्रिटनमधून आयात केल्या जाणाऱ्या वाहनांवरील टॅरिफ १०० टक्क्यांवरुन १० टक्क्यांपर्यंत कमी होतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे की या करारामुळे दोन्ही देशांच्या मैत्रीचा नवा अध्याय लिहिला गेला आहे. युकेमधील सहा विद्यापीठांमध्ये भारतात कँपस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि युकेच्या करारामुळे भारतीय टेक्सटाइल्स, फुटवेअर, जेम्स आणि ज्वेलरी, सी फूड आणि इंजिनिअरिंग उत्पदानं यांना ब्रिटनमध्ये चांगली किंमत मिळेल. भारतातील शेती संबंधीची उत्पादनं, हवाबंद उत्पादनं यांनाही यूकेच्या बाजारात नव्या संधी उपलब्ध होतील.

पंतप्रधान स्टार्मर यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. यासाठी मी त्यांचे आभार मानतो. दहशतवादाच्या विरोधात जी लढाई लढायची आहे त्यासाठी कुठलेही दुहेरी मापदंड नसले पाहिजेत. दोन्ही देशांचं यावर एकमत आहे. तसंच सध्याचा काळ हा विस्तारवादी धोरणापेक्षा विकासाचं धोरण अवलंबण्याचा काळ आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबाद विमान अपघातात मारल्या गेलेल्या सर्व प्रवाशांना श्रद्धांजली वाहिली तसंच आपल्या संवेदनाही व्यक्त केल्या.