India UK Historic Free Trade Deal : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यात आज (२४ जुलै) द्विपक्षीय चर्चा पार पडली. या चर्चेनंतर भारत व ब्रिटनमध्ये एक ऐतिहासिक व्यापार करार संपन्न झाला आहे. दोन्ही देशाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत भारताचे वाणिज्य मंत्री पीयुष गोयल आणि ब्रिटनचे व्यवसाय व व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांच्यात हा करार पार पडला. दोन्ही नेत्यांनी या व्यापार करारावर (एफटीए) स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे उभय देशांमधील व्यापार ३४ अब्ज डॉलर्सने वाढण्याची अपेक्षा आहे.

या ऐतिहासिक करारानंतर पंतप्रधान मोदी व कीर स्टार्मर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी स्टार्मर म्हणाले, “या कराराचा भारत व ब्रिटन या दोन्ही देशांना फायदा होईल. या करारामुळे दोन्ही देशांचं उत्पन्न वाढेल, लोकांचं राहणीमान उंचावेल, नोकरदारांच्या खिशातील पैसे वाढतील, उभय देशांमध्ये अधिक नोकऱ्या निर्माण होतील. व्यावसायासाठीचं वातावरण अधिक उत्तम होईल. यामुळे वस्तूंवरील कर कमी होईल, व्यापार अजून सुलभ होईल.”

पाठोपाठ स्टार्मर यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की हा खूप महत्त्वाचा करार असून यामुळे यूकेमध्ये नव्या नोकऱ्या निर्माण होतील, व्यवासाच्या संधी वाढतील. तसेच आपल्या देशात होणारी गुंतवणूक वाढेल. या काराराशी संबंधित आम्ही एक कृतीशील आराखडा तयार केला आहे.

दोन्ही देशांना मोठा फायदा मिळणार

दुसऱ्या बाजूला या कराराचा भारतालाही मोठा फायदा होणार आहे. एफटीए हा भारताचा एखाद्या विकसित देशाबरोबरचा गेल्या १० वर्षांतील पहिला मोठा द्विपक्षीय व्यापार करार आहे. तसेच २०१६ मध्ये युरोपियन युनियनमधून बार पडण्यासाठी मतदान केल्यानंर आणि २०२० मध्ये अधिकृतपणे युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर यूकेने स्वाक्षरी केलेला हा सर्वात महत्त्वाचा करार आहे.

विविध वस्तूंवरील, सेवांवरील शुल्क काढून टाकणे अथवा कमी करणे हे एफटीए करार करण्याचं मुख्य उद्दीष्ट आहे. यामध्ये चामडे, कपडे व पादत्राणे यांसारख्या कामगार आधारित वस्तूंच्या निर्यातीसाठी चांगली सुविधा निर्माण करणं देखील समाविष्ट आहे. यूके देखील व्हिस्की व कारसारख्या वस्तूंची सुलभपणे आयात करू शकेल.