India Targets Pakistan in UN Meeting: गेल्या काही दिवसांपासून भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंधांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्र व इतर व्यासपीठांवर भारताकडून पाकिस्तानचा जाहीर निषेध केला जात असताना दुसरीकडे क्रिकेटच्या मैदानात आधी पुरुष व नंतर महिला क्रिकेट संघांमध्ये झालेले सामने व त्यातील वादांमुळे यावर वेगवेगळ्या चर्चा दिसून आल्या. आता पुन्हा एकदा भारतानं पाकिस्तानला थेट संयुक्त राष्ट्राच्या बैठकीमध्ये ठणकावलं आहे. पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रातील सदस्य सईमा सलीम यांनी केलेल्या विधानाच निषेध म्हणून भारतानं आपली भूमिका मांडली आहे.

भारताबाबत काय म्हणाल्या होत्या पाकिस्तानच्या सईमा नसीम?

सईमा नसीम यांनी काही दिवसांपूर्वी काश्मिरी महिलांबाबत केलेल्या विधानाची मोठी चर्चा झाली होती. काश्मीरमधील महिलांवरील अत्याचार युद्धातील रणनीतीसारखे वापरले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. “संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्कासंदर्भातील संघटनांनी या उल्लंघनांची नोंद केली आहे. यात महिलांच्या मानवी हक्कांसाठी लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांचा-पत्रकारांचा छळ, बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या घरातील महिलांचा छळ, मारहाण, कैद, लैंगिक शोषण अशा अनेक घटनांचा समावेश आहे”, असा दावा सईमा नसीम यांनी केला होता.

भारताचं सईमा नसीम यांना परखड उत्तर

दरम्यान, पाकिस्तानच्या या आगळिकीवर भारतानं संयुक्त राष्ट्रात भूमिका मांडताना परखड शब्दांत उत्तर दिलं आहे. पाकिस्तानची ही ओरड म्हणजे अवास्तव बडबड असल्याचं भारताने नमूद केलं आहे. भारताचे संयुक्त राष्ट्रातील कायमस्वरूपी सदस्य पर्वतानेनी हरीष यांनी याबाबत भारताची बाजू संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीसमोर मांडली.

“दरवर्षी आपल्याला दुर्दैवाने भारताविरोधातली पाकिस्तानची अवास्तव बडबड ऐकावी लागते. विशेषत: पाकिस्तानकडून कायम दावा सांगितल्या जाणाऱ्या आणि भारतीय भूभाग असणाऱ्या जम्मू-काश्मीरबाबत ते दावे करत असतात. हा तोच देश आहे ज्यांनी १९७१ साली Operation Searchlight राबवलं होतं. आपल्याच देशातील ४ लाख महिला नागरिकांवर आपल्याच लष्कराला बलात्कार करण्याचे परवाने या देशानं दिले होते. पाकिस्तानची दुतोंडी भूमिका जगाला दिसत आहे”, अशा शब्दांत हरीष यांनी पाकिस्तानवर आगपाखड केली.

काय होतं पाकिस्तानातील Operation Searchlight?

पाकिस्तानचं विभाजन होण्याआधी १९७१ साली पाकिस्तानी लष्करानं ऑपरेशन सर्चलाईट सुरू केलं होतं. यात पूर्व पाकिस्तानमधील (आत्ताचे बांगलादेश) राष्ट्रवादी चळवळ ठेचून काढण्यासाठी पाकिस्तानी लष्करानं व्यापक मोहिमा राबवल्या होत्या. एका आकडेवारीनुसार या मोहिमांमध्ये ३ लाखांहून जास्त नागरीक ठार झाले. शिवाय, ४ लाख बंगाली महिलांवर बलात्कार झाल्याचा दावा केला जातो. या यातनांपासून सुटका करून घेण्यासाठी मोठ्या संख्येनं पूर्व पाकिस्तानातून भारतीय हद्दीत स्थलांतर झालं. त्यानंतर भारतानं पूर्व पाकिस्तानातील परिस्थितीत मध्यस्थी केली आणि पाकिस्तानचं विभाजन झालं.