Laura Loomer on India-Pak Tension: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या सहकारी आणि कट्टर उजवी विचारसरणी असलेल्या लॉरा लूमर यांनी भारत-पाकिस्तान तणावावर केलेली एक्स पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. बुधवारी भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबविल्यानंतर लॉरा लूमर यांनी एक्सवर एका ओळीची पोस्ट टाकली. या पोस्टमधून त्यांनी भारताला आपला पाठिंबा तर दर्शविलाच. पण भारत-पाकिस्तान संघर्षात विजय कुणाचा होणार? याचेही सुतोवाच केले.
लॉरा लूमर यांनी लिहिलेल्या पोस्टला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. ३० हजाराहून अधिक लोकांनी या पोस्टला लाईक केले आहे. तर २,५०० हून अधिक जणांनी सदर पोस्ट शेअर केली आहे.
लॉरा लूमर या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्याबरोबर अनेकदा प्रचारात दिसून आल्या होत्या. पण कमला हॅरिस यांच्याविरोधात टोकाची टीका केल्यामुळे त्यांना नंतर प्रचारातून बाजूला करण्यात आले होते. लॉरा लूमर एक्सवर चांगल्याच प्रसिद्ध आहेत. त्यांचे १.६ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्यांच्याकडून अनेकदा आंतरराष्ट्रीय विषयावरील पोस्ट शेअर केल्या जातात.
लॉरा लूमर यांचा अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात चांगला प्रभाव असून त्या स्वतःला प्रो व्हाईट नॅशनॅलिस्ट म्हणवून घेतात. एच-१बी व्हिसा कार्यक्रमावरून त्यांनी स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांच्याशी पंगा घेतला होता.
‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (MAGA) हे डोनाल्ड ट्रम्प यांचे घोषवाक्य आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या आणि दुसऱ्या कार्यकाळात डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘मागा’धोरण मांडले होते. लॉरा लूमर या या धोरणाच्या समर्थक आहेत. २०२० साली त्यांनी रिपब्लिकन फ्लोरीडामधून निवडणुकीच्या माध्यमातून नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना अपयश आले.
लॉरा लूमर काय म्हणाल्या?
भारताने ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर लॉरा लूमर यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “भारत जिंकणार आहे.” लॉरा लूमर यांचे हे विधान भारताच्या बाजूने सदिच्छा व्यक्त करणारे आहे, असे मानले गेले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ऑपरेशन सिंदूर नंतर भारताकडून हे उत्तर अपेक्षित होते, असे म्हटले होते. त्यामुळे अमेरिका या कारवाईत भारताच्या बाजूने असल्याचा संदेश जगभरात गेला.