एक २६ वर्षीय भारतीय तरुणाचा अमेरिकेतील ग्लेशियर नॅशनल पार्कमधील तळ्यात बडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सिद्धांत पाटील असं या तरुणांचे नाव आहे. तो ६ जुलै रोजी सुट्टी साजरी करण्यासाठी ग्लेशियर नॅशनल पार्कमध्ये गेला होता. त्यावेळी तो एका तळ्यात कोसळला. दरम्यान, सिद्धांतचा मृतदेह शोधण्यासाठी शोधमोहिम सुरु आहे, अशी माहिती ग्लेशियर नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सिद्धांत पाटील हा मुळचा महाराष्ट्राचा
सिद्धांत पाटील हा मुळचा महाराष्ट्रातील असून तो सध्या अमेरिकेतील सन जॉस येथे वास्तव्यास होता. तिथे तो एका कंपनीत अभियंता म्हणून नोकरी करत होता. ६ जुलै रोजी तो आपल्या काही मित्रांसह सुट्टी साजरी करण्यासाठी ग्लेशियर नॅशनल पार्कमध्ये गेला होता. तो आणि त्याचे काही मित्र अॅव्हेलाच तळ्याजवळ गेले असताना सिद्धांत अचानक तळ्यात कोसळला.
तळ्यात कसा कोसळला अद्याप अस्पष्ट
सिद्धांतच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो ज्यावेळी तळात कोसळला त्यानंतर काही मिनिटांनी त्याने डोके बाहेर काढले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत केला. महत्त्वाचे म्हणजे सिद्धांत उभा होता, त्या दडगावरून त्याचा पाय घसरला की त्याचा तोल गेला, हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.
आईला केला होता फोन
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने परराष्ट्रमंत्री ए. जयशंकर यांना पत्र लिहित याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. यासंदर्भात बोलताना सिद्धांतचे काका प्रितेश चौधरी म्हणाले, गेल्या शुक्रवारी सिद्धांतने त्याच्या आईला फोन केला होता. त्यावेळी बोलताना पुढचे तीन दिवस आपण अन्य सहा भारतीय मित्रांबरोबर ग्लेशियर नॅशनल पार्कमध्ये फिरायला जात असल्याचे त्याने सांगितले होते.
हेही वाचा – Nepal PM : नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांना ‘प्रचंड’ झटका; संसदेत विश्वासदर्शक ठराव हरले
“भारतीय दुतावासाच्या संपर्कात आहे. मात्र…”
पुढे बोलताना प्रितेश चौधरी यांनी सांगितले, की सिद्धांचे आई आणि वडील सध्या बोलण्याच्या मनस्थितीत नाही. याप्रकरणी मी सोमवारपासून भारतीय दुतावासाच्या संपर्कात आहे. मात्र, सिद्धांतबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. सिद्धांतचे वडील महाराष्ट्र सरकारमध्ये पाटबंधारे विभाग नोकरीला होते, गेल्या मे महिन्यात ते सेवानिवृत्त झाले, असंही प्रितेश चौधरी यांनी सांगितले.
© IE Online Media Services (P) Ltd