Viral Video News : गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेलं सुदानमधील गृहयुद्ध चिघळलं आहे. सुदानी सैन्याचे दोन गट देशावर नियंत्रण मिळवण्यासाठी एकमेकांशी लढत आहेत. एका बाजूला सुदानी सैन्य आहे आणि दुसऱ्या बाजूला रॅपिड सपोर्ट फोर्सेस (आरएसएफ) आहेत. दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात लष्करी संघर्ष सुरू आहे. या संघर्षात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जणांवर उपासमारीची वेळ आली आहे, तर कुपोषणामुळे काही मृत्यूला तोंड देत आहेत.

सुदानीज सशस्त्र दल (SAF) आणि निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) यांच्यातील हा संघर्ष असून या संघर्षाचं केंद्रस्थान सुदानची राजधानी खार्तूम राहिलेलं आहे. सुदानमध्ये हा संघर्ष सुरू असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली असून एका भारतीय तरुणाचं सुदानी बंडखोरांनी अपहरण केल्याची चर्चा आहे. भारतीय तरुणाचं अपहरण केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत सुदानी बंडखोर भारतीय तरुणाची परेड करत आहेत. तसेच बंडखोर हे भारतीय तरुणाला शाहरुख खानला ओळखतो का? असं विचारताना व्हिडीओत दिसत आहेत. या संदर्भातील वृत्त मनी कंट्रोलने दिलं. वृत्तानुसार, अपहरण झालेला तरुण हा ओडिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यातील रहिवासी असून त्याचं नाव आदर्श बेहरा असं असल्याचं सांगितलं जात आहे. हे बंडखोर त्या भारतीय तरुणाला विचारत आहेत की तो ‘शाहरुख खानला ओळखतो का?’, तसेच ते आणखी काही प्रश्न विचारतानाही व्हिडीओत दिसत आहे.

भारताच्या दूतावासांनी काय म्हटलं?

एका भारतीय तरुणाचं सुदानी बंडखोरांनी अपहरण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्रालय खार्तूम आणि दिल्लीतील सुदानी दूतावासाशी संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. या भारतीय तरुणाच्या सुटकेसाठी दूतावास सुरक्षित मार्ग आणि स्थानिक संपर्कांचा शोध घेत आहेत. तसेच ओडिशा राज्यातील अधिकारी या तरुणाच्या कुटुंबाच्या संपर्कात असल्याचंही सांगितलं जात आहे.

सुदानमधील संघर्षाची पार्श्वभूमी काय?

ओमर अल बशीर यांची दीर्घकालीन हुकूमशाही संपुष्टात आणल्यानंतर लोकशाही अस्तित्वात येण्याची आशा निर्माण झाली असताना सुदानमधील दोन शक्तिमान ‘जनरल’ देशावर सत्ता मिळवण्यासाठी सशस्त्र संघर्ष करत आहेत. एकेकाळचे सहकारी असलेले बुरहान आणि ‘हेमेदी’ (छोटे मोहम्मद) या नावाने प्रसिद्ध असलेले दगालो यांच्यात राजधानी खार्तुमसह अन्य महत्त्वाच्या शहरांमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. दोघांना असलेला अन्य देशांचा पाठिंबा हा या युद्धात कुणाचे पारडे जड राहणार यावर परिणाम करणारा आहे. शिवाय दोघांमध्ये चर्चा होऊन युद्धविराम होण्याची शक्यताही आता अन्य देशांच्या भूमिकेवर बरीचशी अवलंबून असेल.