Indigo Plane Emergency Landing at Lucknow Airport: दोन दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर चाक निखळलेल्या एका विमानाचे लँडिंग करण्यात आले होते. सुदैवाने यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आता लखनऊ विमानतळावरही एक मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे. लखनऊहून दिल्लीला जात असलेल्या इंडिगो विमानाच्या उड्डाणासाठी तयार असलेल्या विमानाला अचानक थांबविण्यात आले. इमर्जन्सी ब्रेक लावत वैमानिकाने धावपट्टीवर विमान थांबवले.
या विमानात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी खासदार डिंपल यादवही होत्या. तसेच १५१ प्रवाशीही होते, अशी माहिती मिळत आहे.
लखनऊ विमानतळावर विमानाने उड्डाण घेण्याची तयारी सुरू केली होती. धावपट्टीवर विमान धाऊ लागले. मात्र उड्डाणासाठी आवश्यक असलेले थ्रस्ट इंजिनमध्ये निर्माण होऊ शकले नाही. यामुळे विमानाला इमर्जन्सी ब्रेक लावाला लागला. त्यानंतर विमानातील १५१ प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले गेले. त्यानंतर दुसऱ्या विमानाने प्रवाशांना दिल्लीसाठी रवाना केले गेले.
अहमदाबाद येथे यावर्षी एअर इंडियाच्या भीषण विमान अपघातानंतर एकूणच विमान प्रवासाच्या सुरक्षेविषयी काळजी व्यक्त करण्यात येते. डिजीसीएने विमान प्रवासाच्या सुरक्षेवर भर दिलेला आहे.