गाझामधील युद्ध थांबवण्यासाठी इस्रायलचे अधिकारी आणि हमासच्या नेत्यांमध्ये इजिप्त येथे सोमवारी महत्त्वपूर्ण अनौपचारिक चर्चा सुरू झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडलेल्या २० कलमी प्रस्तावावर ही चर्चा होत आहे. गाझा युद्धाला सोमवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत.

ट्रम्प यांच्या प्रस्तावाला इस्रायलने मान्यता दिली असली तरी, हमासने प्रस्ताव अंशतः मान्य केला आहे. आपण गाझामधील सत्ता सोडण्यास, तसेच उर्वरित ओलिसांची सुटका करण्यास तयार आहोत असे हमासने जाहीर केले. मात्र, इतर अटींबाबत अन्य पॅलेस्टिनी संघटनांशी सल्लामसलत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, हमासने शस्त्रत्याग करावा आणि ओलिसांची सुटका करावी या मागणीसाठी इस्रायल आग्रही आहे. या अटी हमास मान्य करणार की नाही, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. त्याचवेळी, युद्धविराम कशा पद्धतीचा असेल, त्याचे किती टप्पे असतील, याबद्दल मुख्यतः चर्चा होत आहे. इस्रायलचे सैन्य कशा पद्धतीने माघारी जाईल, यावरही यात सविस्तर चर्चा अपेक्षित आहे.

इजिप्तच्या शर्म अल शेख या शहरात लाल समुद्राजवळील एका रिसॉर्टवर ही अप्रत्यक्ष चर्चा सुरू आहे. इस्रायलचे रॉन डर्मर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात सहभागी होत असल्याची माहिती इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने दिली. तर हमासच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व खलिल अल हय्याहकडे आहे.