Pune Connection In Instagram Extortion Case: मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये एक लोकप्रिय इंस्टाग्राम कंटेंट क्रिएटर सायबर गुन्ह्याचा शिकार ठरला आहे. ९६ इंस्टाग्राम पेजवर ५७ लाख फॉलोअर्स असलेले २८ वर्षीय अझीम अहमद याच्याकडून अज्ञात आरोपींनी इंस्टाग्राम पेजेस स्ट्राइक करण्याची आणि बॅन करण्याची धमकी देत ५० लाख रुपयांची खंडणी वसूल केली आहे. पीडित अझीम अहमदने जबलपूर सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे, परंतु हे अज्ञात आरोपी अजूनही फरार आहेत.
सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या या तरुणाने गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावर आपले स्थान निर्माण केले होते. २०१७ मध्ये तयार केलेले त्याचे पहिले इंस्टाग्राम पेज २०२१ मध्ये कोविड लॉकडाऊन दरम्यान प्रचंड लोकप्रिय झाले आणि नंतर त्याने मित्रांसह ‘हूपी डिजिटल’ नावाचे डिजिटल मार्केटिंग स्टार्टअप सुरू केले होते. पण या यशामुळे त्याला सातत्याने खंडणीसाठी धमक्या येत आहेत.
“जवळजवळ एक वर्षापासून मला बनावट कॉपीराइट स्ट्राइक आणि पेज बॅन करण्याच्या धमक्या येत आहेत. हे सायबर आरोपी माझ्या पोस्ट त्यांच्या कंटेंट असल्याचा दावा करतात आणि म्हणतात की जर मी पैसे दिले नाहीत तर माझे अकाउंट डिलीट केले जाईल”, असे अझीम अहमदने सांगितले.
आपले इंस्टाग्राम पेज आणि त्यातून होणारी कमाई गमावण्याच्या भीतीने त्याने खंडणीखोरांना आतापर्यंत ५० लाख रुपये दिल्याचे पीडित अहमदने सांगितले आहे.
अहमदने सांगितले की, त्याला फोन कॉल आणि ईमेल्सच्या माध्यमातून इंस्टाग्राम स्ट्राइकच्या धमक्या येत होत्या. तो म्हणाला की, “पुण्यातील एका कॉलरने बनावट स्ट्राइक काढून टाकण्यासाठी २५,००० ते ३०,००० रुपयांची मागणी केली होती.”
जबलपूर सायबर सेलचे प्रमुख नीरज नेगी यांनी सांगितले की, शहरातील हे पहिलेच प्रकरण आहे जिथे फसवणूक करणाऱ्यांनी “बनावट कंटेंट स्ट्राइक” ची धमकी देऊन पैसे उकळले आहेत. “हा सायबर गुन्हेगारीचा एक नवीन ट्रेंड आहे. फसवणूक करणारे इंस्टाग्रामच्या ऑटोमेटेड कंटेंट सिस्टमचा गैरफायदा घेत आहेत,” असे नेगी म्हणाले.