न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या ट्रेंट बोल्टने भारतातील करोना स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. बोल्ट यंदाच्या आयपीएलचाही भाग होता. अनेक खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर आयपीएल अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आहे.

स्पर्धा तहकूब झाल्यानंतर बोल्ट सुखरुप मायदेशी परतला आणि खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य दिल्याबद्दल त्याची फ्रेंचायझी मुंबई इंडियन्सचे आभार मानले. इंस्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहिताना बोल्ट म्हणाला, की माणूस आणि खेळाडू या दोन्ही भूमिकेत भारताने बरेच काही दिले आहे. करोनाकाळात भारताला पाहताना वाईट वाटते.

बोल्टची पोस्ट

 

आपल्या पोस्टमध्ये बोल्ट म्हणाला, ”भारतीयांना पाहून हृदय हेलावले. आयपीएल संपल्यानंतर मुंबई इंडियन्सची टीम सोडल्याबद्दल मला वाईट वाटते. भारत एक अशी जागा आहे, जिथे मला एक क्रिकेटर आणि व्यक्ती म्हणून खूप काही मिळाले आहे. माझ्या भारतीय चाहत्यांकडून मिळालेल्या पाठिंब्याचा मी नेहमीच आदर केला. ही एक खेदजनक वेळ आहे आणि मला आशा आहे, की गोष्टी लवकरच सुधारतील. मी या सुंदर देशात परत येण्याची वाट पाहत आहे.”

आयपीएल २०२१च्या बायो बबलमध्ये करोनाची प्रकरणे नोंदवल्यानंतर बीसीसीआयने ही लीग पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता या लीगचे उर्वरित सामने सप्टेंबरमध्ये घेण्याची योजना आखली जात आहे. मुंबईने ७ सामन्यात ४ विजयांसह गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले आहे. लीगमध्ये त्यांना ३ पराभव पत्करावे लागले आहेत. दिल्ली कॅपिटल्सने १२ गुणांसह पहिले, तर चेन्नईने १० गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहेत.