Iran Exiled Prince Reza Pahlavi on US Attacks on Iran : इस्रायल-इराण युद्धात अमेरिकेने उडी घेतल्यामुळे जगभर मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेने शनिवारी रात्री इराणच्या अणूऊर्जा केंद्रांवर हवाई हल्ले केले. तर, इराणने इस्रायलवर क्षेपणास्र डागून जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, इराणचे हद्दपार केलेले राजे रेझा शाह पहलवी यांनी इराण-अमेरिका संघर्षाचं खापर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्यावर फोडलं आहे. रेझा शाह पहलवी म्हणाले, “इराणमध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतरच शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते”.

इराणचे हद्दपार केलेले राजे रेझा शाह पहलवी यांनी अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “आण्विक तळांवर झालेले हल्ले हे इराणच्या विनाशकारी अण्वस्त्र निर्मितीसाठी चालू असलेल्या संशोधनाचे परिणाम आहेत. यामुळे इराणी लोकांचं हित धोक्यात आलं आहे. अली खोमेनी व त्यांचं पडझड होत असलेलं दहशतवादी शासन देशाला मागे नेत आहे”.

इराणच्या हद्दपार केलेल्या राजाचं खोमेनींना आवाहन

रेजा शाह पहलवी यांनी अली खोमेनी यांना आवाहन केलं आहे की “तुम्ही तुमच्या भूमिगत बंकरमध्ये बसून अमेरिका व इस्रायलला प्रत्युत्तर देण्यासाठी काय कारवाई करता येईल यावर विचार करत असाल. मात्र, त्यावर विचार करण्याऐवजी किंवा एखादा नवा कट रचण्याऐवजी इराणी जनतेच्या हितासाठी तुमच्या पदाचा राजीनामा द्या. जेणेकरून गौरवशाली इराणी राष्ट्र इस्लामिक प्रजासत्ताकाचा काळ मागे टाकून नव्याने शांतता, समृद्धी व महानतेचा अध्याय सुरू करू शकेल. सध्याची इराणमधील व्यवस्था म्हणजेच खोमेनींचं शासन हटवणं हाच इराणमध्ये शांतता निर्माण करण्याचा एकमेव मार्ग आहे”.

अमेरिकेच्या हल्ल्यावर खोमेनींची भूमिका काय?

अमेरिकेने इराणमध्ये केलेल्या कारवाईनंतर अयातुल्ला अली खामेनी यांनी बदला घेणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यांचे प्रतिनिधी हुसेन शरीयतमदारी यांनी इराणी माध्यमांशी बोलताना सांगितलं की “पहिले पाऊल म्हणून ते बाहरीनमधील अमेरिकन नौदलाच्या ताफ्यावर क्षेपणास्त्र हल्ला करतील आणि होर्मुझचा सागरी मार्ग बंद करतील. आता कुठलाही विलंब न करता कारवाई करण्याची आमची वेळ आहे. पहिलं पाऊल म्हणून आम्ही बाहरीनमधील अमेरिकन नौदलाच्या ताफ्यावर क्षेपणास्त्र हल्ला केला पाहिजे असं आमचं ठरलंय. मात्र, त्याच वेळी अमेरिकन, ब्रिटिश, जर्मन व फ्रेंच जहाजांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी (दोन जलाशयांना जोडणारा अरुंद मार्ग) बंद केली पाहिजे, असाही एक सूर आहे.