एपी, कनॅनस्किस

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इतर जी-७ देशांच्या नेत्यांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनामध्ये ‘इराणकडे कधीही अण्वस्त्र असू नयेत’, असे म्हटले आहे. तसेच, गाझा पट्टीत युद्धविरामासह पश्चिम आशियातील तणाव निवळण्याचे आवाहन या देशांनी केले. इस्रायल-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प या परिषदेतून लवकर मायदेशी परतले.

परिषदेतून ट्रम्प यांच्या लवकर जाण्यावर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धविरामासंबंधी चर्चा सुरू असल्याचे सांगितले. मात्र, ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमावर पोस्ट करून मॅक्रॉन यांना चपराक दिली. ट्रम्प म्हणाले, ‘मी इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये युद्धविराम व्हावा, यासाठी वॉशिंग्टनमध्ये परतलो, असे मॅक्रॉन चुकीने म्हणाले. मी वॉशिंग्टनमध्ये का आलो, हे त्यांना माहीत नाही. पण, मी येण्याचा आणि युद्धविरामाचा काहीही संबंध नाही.’ अमेरिकी नागरिक सुरक्षित राहतील, यासाठी अध्यक्षांबरोबर चर्चा सुरू होती, असे संरक्षणमंत्री हेगसेट यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितले.

ट्रम्प यांनी रशिया-युक्रेनबाबतही भूमिका इतर देशांपेक्षा वेगळी मांडली. ट्रम्प यांच्याखेरीज इतर देशांनी रशिया-युक्रेन युद्धात रशियाला आक्रमक म्हणून संबोधले आहे. ट्रम्प यांनी मात्र, जी-७ परिषदेतून रशियाला बाहेर काढले नसते, तर युद्धच झाले नसते, असा दावा केला. रशियावर निर्बंध लादणार का, यावर युरोपला प्रथम ते करू देत, असे ते म्हणाले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जी-७ परिषदेमधून लवकर मायदेशी परतल्यानंतर उर्वरित देशांच्या नेत्यांनी एकत्र येऊन परिषदेमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यासह ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि जपानच्या पंतप्रधानांबरोबरच युक्रेनचे अध्यक्ष व्लोदोमिर झेल्येन्स्की, ‘नेटो’चे प्रमुख मार्क रूट हेदेखील परिषदेमध्ये चर्चेत अखेरच्या दिवशी सहभागी होणार आहेत.

इराणच्या अणुप्रकल्पावर परिणाम

● इस्रायलच्या हवाई हल्ल्यामुळे इराणच्या नतान्झ येथील अणुप्रकल्पावर थेट परिणाम झाल्याचा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचा दावा. विश्लेषण आणि उपग्रहीय छायाचित्रांच्या आधारावर निष्कर्ष.

● पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा वीस देशांच्या संयुक्त निवेदनातून निषेध. चर्चेच्या माध्यमातून स्थिरता प्रस्थापित करण्याचे आवाहन. इस्रायलला या देशांनी आक्रमक संबोधले आहे. इजिप्त, जॉर्डनसह अल्जिरिया, बहारिन, ब्रुनेई, छाड, कोमोरॉस, जिबुती, इराक, कुवेत, लिबिया, मॉरिटानिया, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, सोमालिया, सुदान, तुर्कीये, ओमान, संयुक्त अरब आमिराती या देशांचा यात समावेश आहे.