Iran Warns Arab Countries Over Israel Conflict : मध्य-पूर्व आशियात सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे. इस्रायल-हमास, इस्रायल-हेझबोला युद्ध चालू असतानाच इस्रायल-इराण संघर्ष सुरू झाला आहे. १ ऑक्टोबर रोजी इराणने इस्रायलवर क्षेपणास्रं डागली. मात्र, या हल्ल्यानंतर इस्रायल स्वस्थ बसणार नाही याची सर्वांनाच कल्पना आहे. इराणला देखील इस्रायलच्या पलटवाराची चिंता आहे. त्यामुळे इराणने इस्रायलला मदत करणाऱ्या देशांना इशारा दिला आहे. इराणने प्रामुख्याने अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांना, तेलसंपन्न देशांना इशारा दिला आहे की “तेहरानच्या विरोधात जो कोणी हवाई हल्ला करेल त्यांना तुमच्या हवाई हद्दीचा वापर करू दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील”.
वॉल स्ट्रीट जर्नलने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की इराणने अरब राष्ट्रांना व शेजाऱ्यांना इशारा दिला आहे की त्यांची जमीन व हवाई हद्द इराणवर हल्ला करण्यासाठी, अमेरिका किंवा इस्रायली वायूदलाला वापरण्यास देऊ नये. आमच्याविरोधातील कारवायांना अप्रत्यक्ष मदत केल्यास तुमची खैर नाही, अशा शब्दांत इराणने इशारा दिला आहे.
हे ही वाचा >> हेच खरे हिरो! १४१ प्रवाशांना विमानात तांत्रिक बिघाडानंतरही सुखरूप खाली उतरवणाऱ्या वैमानिकांवर कौतुकाचा वर्षाव; पाहा VIDEO!
दरम्यान, इराणच्या या धमकीचे परिणाम देखील दिसू लागले आहेत. अमेरिकन संरक्षण अधिकाऱ्यांचा हवाला देत वॉल स्ट्रीट जर्नलने वृत्त प्रसिद्ध केलं आहे की मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांनी म्हटलं आहे की इराणवर कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यासाठी इस्रायल किंवा अमेरिकेला ते त्यांची जमीन किंवा हवाई हद्द वापरू देणार नाहीत. इराणने १ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर २०० क्षेपणास्रं डागली होती. त्यानंतर मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. इराणसह अमेरिकेलाही भिती आहे की इस्रायल संतापाच्या भरात इराणमधील तेलविहिरी किंवा अणुभट्टीवर हमला करू शकतो.
इराणने इस्रायलला डिवचल्यामुळे तणाव वाढला?
इस्रायलच्या हेझबोलाविरोधी कारवाईस निषेधात्मक प्रत्युत्तर म्हणून इराणने १ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर १८० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. या माऱ्याने इस्रायलचं फारसं नुकसान झालं नाही. तरी एप्रिल महिन्यात इराणकडून झालेल्या अग्निबाण आणि ड्रोन वर्षावापेक्षा हा हल्ला अधिक सुनियोजित आणि गंभीर होता. या हल्ल्यास प्रत्युत्तर देण्याचा इरादा इस्रायलने जाहीर केला आहे. त्यामुळे येथून पुढे इराण आणि इस्रायल या कट्टर शत्रूंमध्ये थेट संघर्षाची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
© IE Online Media Services (P) Ltd