Iran On Israel : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला इराण-इस्रायलमधील संघर्ष काही प्रमाणात निवाळल्याचं दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-इस्रायल युद्धसमाप्तीची घोषणा केल्यानंतर हा तणाव कमी झाल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. मात्र, असं असलं तरी इराण-इस्रायल संघर्षात अमेरिकेनेही उडी घेत इराणमधील ३ आण्विक तळांवर हल्ला करत ते आण्विक तळ नष्ट केल्याचा दावा केला होता. त्यामुळे हा संघर्ष आणखी वाढणार का? याबाबत जगाला चिंता लागली होती. पण अखेर ट्रम्प यांनी इराण-इस्रायलमधील युद्धसमाप्तीची घोषणा केली.

सध्या इराण-इस्रायलमध्ये तणावपूर्ण शांतता असली तरी इराण आणि इस्रायलमधील नेत्यांमध्ये शा‍ब्दिक युद्ध सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी इस्रायलवर जहरी टीका केली आहे. तसेच ही टीका करत असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही खोचक टिप्पणी केली आहे. मंत्री अब्बास अराक्ची यांनी इस्रायलवर टीका करताना म्हटलं की,’डॅडीकडे मदत मागण्याशिवाय पर्याय नव्हता.’ तसेच यावेळी अब्बास अराक्ची यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबतही खोचक टिप्पणी केली. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

मंत्री अब्बास अराक्ची काय म्हणाले?

एक्सवरील (ट्विटर) एका पोस्टमध्ये मंत्री अब्बास अराक्ची यांनी म्हटलं आहे की, “महान आणि शक्तिशाली इराणी लोकांनी जगाला दाखवून दिलं की आपल्या (इराणच्या) क्षेपणास्त्रांपासून वाचण्यासाठी इस्रायली राजवटीला ‘डॅडी’कडे मदत मागण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. इराणी लोक धमक्या आणि अपमान सहन करत नाहीत. जर भ्रमामुळे मोठ्या चुका झाल्या तर इराण आपली खरी क्षमता उघड करण्यास मागेपुढे पाहणार नाही, ज्यामुळे इराणच्या सामर्थ्याबद्दलचा कोणताही भ्रम नक्कीच संपेल”, असं मंत्री अब्बास अराक्ची यांनी म्हटलं आहे.

इराणवर कोणत्या ३ आण्विक तळांवर अमेरिकेने हल्ला केला?

अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर अमेरिकन आणि इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, या कारवाईत अमेरिकन स्टेल्थ बॉम्बर्स आणि जीबीयू-५७ बंकर बस्टर बॉम्ब वापरण्यात आले. जे मजबूत भूमिगत टार्गेट करण्यास सक्षम आहेत. अमेरिकेने इराणच्या ३ अणुकेंद्रावर केलेल्या हल्ल्यात इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान हे तीनही आण्विक तळ नष्ट झाल्याचा दावा अमेरिकेने केला.

युद्धबंदीनंतर अयातुल्ला अली खामेनी काय म्हणाले होते?

इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी झाल्यानंतरच्या पहिल्याच भाषणात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेला इशारा दिला होता. खामेनी यांनी म्हटलं होतं की, “भविष्यात अमेरिकेच्या हल्ल्यांना मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले जाईल. इराण कधीही अमेरिकेसमोर शरणागती पत्करणार नाही आणि भविष्यात होणाऱ्या हल्ल्याची त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल”, असे इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीनंतरच्या त्यांच्या पहिल्याच भाषणात अयातुल्ला अली खामेनी यांनी म्हटलं होतं.