दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी ट्विटरवरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला. दिल्लीचे राज्यपाल नजीब जंग आप सरकाराच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याचे यावेळी केजरीवाल यांनी म्हटले. सध्या राज्यपाल नजीब जंग यांच्याकडून परस्पर अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना कोणतीही फाईल न दाखवता निर्णय घेतले जात आहेत. हेच लोकशाहीचे मोदी मॉडेल आहे का?, असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी अनेकदा विनंती करूनही नजीब जंग यांनी अधिकाऱ्यांची बदली केली. नजीब जंग यांच्या माध्यमातून दिल्लीचा कारभार उद्ध्वस्त करण्यावर नरेंद्र मोदी ठाम आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
Today, several officers transferred by LG directly. Files not even shown to CM or any minister. Is this Modi model of democracy?
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 30, 2016
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी नायब राज्यपालांचे पाय धरून त्यांनी मोहल्ला क्लिनिक आणि शाळांची निर्मिती करत असलेल्या सचिवांची ३१ मार्चपर्यंत बदली करू नये, असे सांगितले होते. मात्र त्यांनी ऐकले नाही‘, असेही केजरीवाल यांनी दुसऱ्या एका ट्विटद्वारे सांगितले आहे. नायब राज्यपाल नजीब जंग आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यात अनेक मुद्द्यांवरून वारंवार खटके उडत आहेत. नजीब जंग यांच्या माध्यमातून केंद्र सरकारवर दिल्लीत हस्तक्षेप करू पाहत आहे, असा आरोप अनेकदा केजरीवाल यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश असून याठिकाणी राज्यपाल जंग यांचा शब्द अंतिम असल्याचा निकाल दिला होता. त्यामुळे आप सरकारला मोठा धक्का बसला होता. आज अधिकाऱ्यांच्या अचानक झालेल्या बदल्यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण झाला. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला.