तीन दिवसांपूर्वी पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने अचानक इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले आहेत. या कृत्यानंतर पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील युद्धाला सुरुवात झाली आहे. या संघर्षात आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक जखमी झाले आहेत. हा विध्वंस अद्याप थांबला नाही. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोठं विधान केलं आहे. हे युद्ध आम्ही सुरू केलं नसलं तरी या युद्धाचा शेवट आम्हीच करू, असा स्पष्ट इरादा नेतन्याहू यांनी व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हणाले, “इस्रायल युद्धाशी दोन हात करत आहे. हे युद्ध आम्हाला नको होतं. पण अत्यंत क्रूर आणि हिंसक मार्गाने हे युद्ध आमच्यावर लादण्यात आलं आहे. पण हे युद्ध इस्रायलनं सुरू केलं नसलं तरी याचा शेवट आम्हीच करणार आहोत. एकेकाळी ज्यू लोक राज्यहीन होते. काही काळासाठी ज्यू लोक निराधार होते. पण यापुढे असं चालणार नाही.”

हेही वाचा- अफगाणिस्तानात तीव्र भूकंप; मृतांचा आकडा २०५३ वर, ९ हजाराहून अधिक जखमी

“आपल्यावर हल्ला करून त्यांनी ऐतिहासिक चूक केली आहे, हे आता हमासला समजेल. त्यांच्या आणि इस्रायलच्या इतर शत्रूंच्या स्मरणात राहतील, असा धडा शिकवला जाईल. हमासने निर्दोष इस्रायलींवर केलेले क्रूर हल्ले मनाला चटका लावणारे आहेत. कुटुंबांची त्यांच्या घरात कत्तल करणे, भर कार्यक्रमात शेकडो तरुणांची कत्तल करणे, स्त्रिया, मुलं आणि वृद्धांचं अपहरण करणं, अगदी होलोकॉस्टमधून वाचलेल्यांचं अपहरण करणं, या गोष्टी मनाला चटका लावणाऱ्या आहेत. हमासच्या दहशतवाद्यांनी लहान मुलांना बांधलं, जाळलं आणि मारलं. ते रानटी आहेत. हमास म्हणजेच ISIS आहे,” अशा शब्दांत बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा- “मला मारू नका”; इस्रायली विद्यार्थिनीचं हमासकडून अपहरण, थरकाप उडवणारा VIDEO

‘एक्स’वरील पोस्टमध्ये नेतन्याहू पुढे म्हणाले, “ज्याप्रमाणे ISIS ला पराभूत करण्यासाठी जगातील शक्तींनी एकजूट केली. त्याचप्रमाणे जगातील विविध देशांनी हमासचा पराभव करण्यासाठी इस्रायलला साथ दिली पाहिजे. राष्ट्राध्यक्ष ज्यो बाडेन यांच्या निःसंदिग्ध समर्थनाबद्दल मला त्यांचे आभार मानायचे आहेत. मला जगभरातील नेत्यांचे आभार मानायचे आहेत जे आज इस्रायलच्या पाठीशी उभे आहेत. इस्रायल केवळ स्वतःच्या लोकांसाठी हमासशी लढत नाही. तर हिंसक वृत्तीच्या विरोधात उभ्या असलेल्या प्रत्येक देशासाठी इस्रायल लढत आहे. हे युद्ध इस्रायल जिंकेल आणि जेव्हा इस्रायल जिंकेल तेव्हा संपूर्ण जग जिंकेल.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel prime minister benjamin netanyahu on hamas attack we didnt start war but will finish it rmm